एखाद्या मंत्र्याला हे बोलणं शोभत नाही, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रीया
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांची जीभ घसरली.
मुंबई : शिवसेना नेते (Shiv Sena) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. अनेक राजकीय नेत्यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली होती. दरम्यान, या प्रकरणी आता जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini ) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "एखाद्या मंत्र्याला हे बोलणं शोभत नाही." अशी प्रतिक्रीया हेमा मालिनी यांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालांशी केली होती.
"हा ट्रेंड गेल्या काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी सुरू केला होता. त्यामुळे सर्वांनीच त्याचा वापर केला होता. सामान्य लोकांनी असे बोलले तर ठिक आहे. परंतु, एखाद्या मंत्र्याने असे बोलणे ठिक नाही. अशी प्रतिक्रीया हेमा मालिनी यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांची जीभ घसरली. आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना त्यांनी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. "गेली 30 वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.
गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळं त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका सुरु झाली. याचपार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलंय. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या