Whip: 'अतिशय महत्वाच्या विषयासाठी' आज संसदेत उपस्थित रहा, भाजपच्या खासदारांना व्हिप जारी
भाजपने (BJP) आपल्या लोकसभा खासदारांना शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप (Whip) बजावला आहे. 'अतिशय महत्वाच्या विषयावर' सरकारच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
नवी दिल्ली: 'अतिशय महत्वाच्या विषयावर' केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी शनिवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर संसदेत उपस्थित रहा असा व्हिप भाजपने आपल्या लोकसभेतील खासदारांना बजावला आहे. त्यामुळे शनिवारी नेमका कोणता 'अतिशय महत्वाचा विषय' संसदेत मांडण्यात येणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
भाजप पक्षाच्या वतीनं शुक्रवारी आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, "शनिवारी 13 फेब्रुवारी रोजी एक महत्वाचा विषय लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या सर्व खासदारांना सूचित करण्यात येतंय की त्यांनी आपल्या सरकारच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर संसदेत उपस्थित रहावं." हा व्हिप पक्षाचे प्रमुख व्हिप राकेश सिंग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.
सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे सरकार 'क्रॉनीजीवी' असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांनी हे सरकार 'हम दो, हमारे दो' अशा चार लोकांचं असल्याची टीका केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर देशभर चर्चा झाली होती.
PM Modi Speech | लोकसभेत पंतप्रधानांकडून नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, काँग्रेसचा सभात्याग
राज्यसभा खासदार आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही केंद्र सरकारचे हे अर्थसंकल्प हे 'श्रीमंतांकडून, श्रीमंतांचे आणि श्रीमंतांसाठी' असल्याची टीका केली होती. तर खासदार शशी थरुर यांनी 'ना जवान, ना किसान' असं या अर्थसंकल्पाचं स्वरुप असल्याची टीका केली होती.
बुधवारी पंतप्रधानांनी संसदेत नव्या कृषी कायद्यावरुन सरकारच्या भूमिकेचे समर्थन केलं होतं. पण तरीही विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिपमुळे शनिवारचा दिवस हा संसदेसाठी महत्वाचा असणार आहे हे नक्की.
'हम दो हमारे दो'चं सरकार; कृषी कायद्यांवर बोलताना राहुल गांधींचा सरकारवर निशाणा