अयोध्येमध्ये मोठी दुर्घटना!शरयू नदीत स्नान करतेवेळी एकाच परिवारातील 12 जण बुडाले
उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील शरयू नदीमध्ये 12 लोक बुडाले असल्याची घटना समोर आली आहे. एकाच परिवारातील लोक गुप्तार घाटावर स्नान करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.
अयोध्या: उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील शरयू नदीमध्ये 12 लोक बुडाले असल्याची घटना समोर आली आहे. एकाच परिवारातील लोक गुप्तार घाटावर स्नान करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित यंत्रणांना आदेश देत रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या घटनेतील सहा लोकांना वाचवण्यात आतापर्यंत यश मिळालं आहे तर अद्याप सहाजणांना शोध सुरु आहे. सहा जणांपैकी तिघांनादवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.
माहितीनुसार एकाच परिवारातील 15 लोक याठिकाणी गेले होते यापैकी 12 जण बुडाले. बुडणाऱ्या तिघांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ वाचलं. बुडणाऱ्या लोकांमध्ये महिला आणि बालकांचा देखील समावेश आहे. घटनेतील परिवार हा आग्रा सिकंदराबादमधून अयोध्येला आला असल्याची माहिती आहे.
दरवर्षी मान्सून सुरु झाल्यानंतर पुराचा सामना करावा लागणारा उत्तरप्रदेशातील या भागात यंदा जास्त नुकसान झालेलं नाही. मात्र पावसामुळं नद्यांची पाणी पातळी आणि पाण्याचा वेग जास्त आहे. अशात काळजी न घेतल्यामुळं अशा दुर्घटना घडत असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे.