'भारतरत्न' स्वीकारण्यास भूपेन हजारिकांच्या कुटुंबियांचा नकार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि समाजसेवक नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती.
नवी दिली : प्रसिद्ध दिवंगत गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पूर्वोत्तर भारतासाठीच्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणांविषयीच्या मुद्द्यावरुन वडिलांसाठीच्या 'भारतरत्न'वर बहिष्कार टाकण्याची भूमिका भूपेन हजारिका यांचे चिरंजीव तेज हजारिकांनी घेतली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि समाजसेवक नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती.
भूपेन हजारिकांसाठीच्या भारतरत्नला नकार का?
भारतरत्न नाकारताना वडिलांच्या नावाच्या राजकीय गैरवापराविषयी तेज हजारिकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय नागरिकत्व कायद्यातील सुधारणांविषयी ईशान्य भारतात असंतोष उफाळला आहे. भारतासाठीच्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणांमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.
ईशान्येतील बांगलादेशी घुसखोरांपैकी एका मोठ्या वर्गाला कायदेशीर नागरिकत्व मिळण्याची भीती यामुळे व्यक्त केली जात आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये घुसखोरांना अभय मिळण्याच्या भीतीनं याठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली. बांगलादेशी घुसखोरांमुळे पिडलेल्या आसाममध्ये अधिकच असंतोष भडकला आहे.
परदेशी घुसखोरांमुळे मूळ आसामी अल्पसंख्य होऊन संस्कृती धोक्यात आल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. अपेक्षेने निवडून दिलेल्या भाजप सरकारकडूनच नवा सुधारित कायदा आणण्यात आला. ईशान्येतील एनडीएतील प्रादेशिक मित्रपक्षांकडूनही नागरिकत्व कायद्यातील सुधारणांना विरोध होत आहे.
काय आहे भारतीय नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016?
भारताचा नागरिक कोण आहे? याच्या व्याख्येसाठी 1955 साली एक कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्याला 'नागरिकत्व अधिनियम 1955' नाव देण्यात आलं होतं. मोदी सरकारने याच कायद्यात संशोधन केलं, त्याला 'नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016' नाव देण्यात आलं. या विधेयकावरुन भारतात सहा वर्ष वास्तव्यास केलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध पारसी, ख्रिश्चन धर्मियांना कोणत्याही कागदपत्रांविना भारतीय नागरिकत्व मिळणार. मात्र नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार योग्य कागदपत्रांच्या आधारावर अशा लोकांना 12 वर्षांच्या भारतातील वास्तव्यानंतर नागरिकत्व मिळत होतं.
भूपेन हजारिका (8 सप्टेंबवर 1926 - 5 नोव्हेंबर 2011) आसाममधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक होते. याशिवाय ते कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे अभ्यासक होते. बालपणापासूनच संगीताची साधना सुरु करणाऱ्या भूपेन हजारिका यांनी वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं.
भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सदिया गावात झाला. 1946 मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रातून पदवी मिळवली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचं शिक्षण घेतलं.
भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला.