Bakrid 2023 : देशभरात बकरी ईदचा उत्साह, 'या' दिवशी कुर्बानी देण्यामागे आहे रंजक कथा, तुम्हाला माहितीय?
Eid al-Adha 2023 : मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-अजहा हा सण आज 29 जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. या दिवशी बकऱ्याचा बळी देण्यामागे खास कारण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Eid al-Adha 2023 : आज हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र दिवस आहे. यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) आणि बकरी ईद (Bakri Eid 2023) हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-अधा (Eid al-Adha 2023) हा सण आज 29 जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून जगप्रसिद्ध बालाजी मंदिर असलेल्या देऊळगाव राजा आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील मुस्लिम बांधवांनी या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. निर्णय घेतल्यावर समाज बांधवांनी पोलिस प्रशासनास निर्णयच पत्र देऊन कळविण्यात आलं आहे. या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वच स्तरातून स्वागत होतं आहे.
देशभरात बकरी ईदचा उत्साह
आज मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अधा हा सण साजरा केला जाणार आहे. ईद उल अजहाला बकरी ईद असंही म्हणतात. या दिवशी बकऱ्याचा कूर्बानी दिली जाते. ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी का दिली जाते ते जाणून घ्या. ईद-उल-फित्र म्हणजेच 'मिठी ईद' ईद-उल-अधाच्या दोन महिने आधी साजरी केली जाते. त्यानंतर दोन महिन्यांनी ईद-उल-अधा म्हणजेच बकरीद साजरी केली जाते.
बकरीदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व
बकरीदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. या कुर्बानीनंतर जे मांस मिळतं त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो. कुर्बानी तीन भागांत व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते.
बकऱ्याची कुर्बानी देण्यामागे आहे रंजक कथा
इस्लामिक धर्माच्या मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम हे अल्लाहचे पैगंबर असल्याचं म्हटलं जातं. हजरत इब्राहिम हे सदैव लोककल्याणात मग्न राहिले. त्यांनी आयुष्याचा अधिक काळ समाजसेवेत घालवला. मात्र, अनेक वर्ष त्यांना मुलं झालं नाही. यानंतर त्यांनी अल्लाहची ईबादत केली. त्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्याचं नाव इस्माईल ठेवण्यात आलं. मुलाच्या जन्मानंतर, इब्राहिम यांना एक स्वप्न पडलं. अल्लाहने स्वप्नात त्यांना कुर्बानी देण्याची आज्ञा दिली. त्यांनी आधी प्रथम उंटाचा बळी दिला. यानंतर त्यांना पुन्हा एक स्वप्न पडलं आणि त्याला आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश देण्यात आला.
इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिमसाठी यांच्यासाठी अल्लाहचा आदेश होता की, त्यांना प्रिय वस्तूची कुर्बानी द्यावी लागेल. यानंतर हजरत इब्राहिम यांनी आपल्या प्रिय मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक मान्यतेनुसार, अल्लाहच्या आदेशानुसार पुत्र इस्माईलची कुर्बानी देण्यापूर्वी हजरत इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बांधले आणि त्याचा गळ्यावर चाकू ठेवला. मात्र, त्यांनी कुर्बानीसाठी चाकू वर उगारताच अचानक मुलगा इस्माईल यांच्याऐवजी एक डुंबा (बकरी) तेथे आला. हजरत इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माईल सुरक्षित होता आणि त्यांनी बकऱ्याची कुर्बानी दिली होती.
इस्लामिक मान्यतेनुसार, ही केवळ अल्लाहची परीक्षा होती. अल्लाहच्या आदेशानुसार हजरत इब्राहिम आपल्या मुलाचीही कुर्बानी देण्यास तयार झाले. इब्राहिम यांचा विश्वास आणि त्याग पाहून अल्लाहने त्यांना पैगंबर बनवलं. तेव्हापासून बोकडाचा बळी देण्याची परंपरा सुरू झाली. दरवर्षी बकरीदची तारीख धुल हिज्जा महिन्यात चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. इस्लामिक कालगणनेनुसार, धूल हिज्जा हा इस्लामचा 12 वा महिना आहे.