Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?
Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे सध्या बागेश्वर महाराज प्रचंड चर्चेत आहेत.
Dhirendra Krishna Shastri : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांची... हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला.
कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) प्रचंड चर्चेत आहेत. धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज... गेल्या एका आठवड्यापासून चर्चेत असलेलं हे व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी काय?
कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म 1996 साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथाकथित महाराज कसे बनले?
धीरेंद्र यांचे आजोबा भगवानदास गर्ग हे निस्सिम हनुमान भक्त होते. बागेश्वरमध्ये असलेल्या हनुमान मंदिराचे ते पुजारी होते. त्यांच्याकडे दिव्यशक्ती होती, ज्याद्वारे ते लोकांचं भविष्य जाणून घ्यायचे, असा गर्ग कुटुंबियांचा दावा आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या या अलौकिक शक्तीमुळेच, आपल्याला लोकांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा धीरेंद्र महाराज करतात.
जसं शिक्षण सुटलं, तसं धीरेंद्र महाराजांनी आपल्या आजोबांप्रमाणेच आपलाही दरबार भरवायला सुरुवात केली. अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी धीरेंद्र महाराज लोकांच्या समस्यांच्या निराकरणाचा दावा करु लागले. सोबत रामकथा असल्याने रामभक्तांची गर्दी होऊ लागली. गर्दी वाढू लागली आणि धीरेंद्र महाराजांचे दरबार देशभरात होऊ लागला.
बागेश्वर बाबांची पद्धत काय?
उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवायचं. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत.
बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात, तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर महाराजांना चॅलेन्ज केलं, तेव्हापासून तर त्यांच्या दरबारात मीडियाचीही गर्दी झाली आहे. शुक्रवारी (20 जानेवारी)बाबांनी एका महिला पत्रकारालाच चॅलेन्ज दिलं आहे.
महिला पत्रकाराला दिलं चॅलेन्ज
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महिला पत्रकाराला चॅलेंज देत, तुम्ही गर्दीतून कोणत्याही एका व्यक्तीला घेऊन या, त्या व्यक्तीच्या वेदना आणि समस्या मी आधीच लिहिन. यानंतर महिला पत्रकाराने लाखोंच्या गर्दीतून एका महिलेला बाहेर काढले. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्यांनी महिलेबाबत सांगितलेल्या गोष्टी तिच्या पत्रिकेत लिहिल्या असल्याचं बोललं जात आहे.
परदेशातही भरले बाबांचे दरबार
धीरेंद्र महाराजांचे हे दावे आणि त्यांचे चमत्कार हा सध्या ट्रेन्डिंग विषय बनला आहे. कारण अवघ्या 26 वर्षांचा तरुण गेल्या 10 वर्षांपासून लाखो लोकांचा देव बनला आहे. या देवाला अंनिसने आव्हान दिलं आहे, जे आव्हान महाराजांनी स्वीकारलं आहे. हे चॅलेंज कोण जिंकणार, हे आता पाहावं लागेल.