(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rat Murder Case: उत्तर प्रदेशातील 'उंदराच्या मर्डर केस'मध्ये मोठा खुलासा, पोस्टमॉर्टमधून आलं हे सत्य समोर....
Viral News: उत्तर प्रदेशातील बदांयूमध्ये (Badaun) एका तरुणावर उंदराची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासंबंधित तक्रार दाखल करण्यात आली होती.
लखनौ: केवळ उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर देशभर चर्चेत आलेल्या बदायूं (Badaun) जिल्ह्यातील एका उंदराच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या उंदराची हत्या करण्यात आली नसून त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून (Postmortem Report) स्पष्ट झालं आहे. या उंदराची हत्या गटराच्या पाण्यामध्ये बुडवून करण्यात आली नसून त्याची फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणी आता पोलिस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या उंदराला दोरी बांधून त्याला गटारात बुडवून मारण्यात आल्याचा आरोप एका व्यक्तीवर ठेवण्यात आला होता.
उंदीर हा असा प्राकी ज्यामुळे बहुतांश लोक त्रासून जातात. शेतकऱ्यांसाठीही उंदीर तसे शत्रूच. त्यामुळे जो तो या उंदरांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. बाजारात उंदीर मारण्याचे औषधंही मिळतात. अशातच उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एक आगळीच घटना घडली. एका पशूप्रेमीला समजलं की एक व्यक्तीने उंदराला बांधून त्याला गटारात टाकलं आणि मारलं. त्यानंतर तो पशूप्रेमी चांगलाच भडकला आणि त्याने थेट त्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
या घटनेची माहिती भाजपच्या खासदार मनेका गांधी यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर या उंदराची हत्या कशी झाली याचा तपास करण्याचा निर्णय घेतला आणि उंदाराची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली. या उंदराची बॉडी बरेलीच्या इज्जतनगरमधील आयव्हीआरआयमध्ये पाठवण्यात आली. या घटनेची तीव्रता लक्षात घेता दोन उच्चस्तरीय डॉक्टरांनी या उंदराचे पोस्टमॉर्टम केलं.
बदायूंमध्ये एका घरात उंदराला पकडून त्याच्या शेपटाला दोरी बांधली आणि ती दोरी एका विटेला बांधून त्या उंदराला गटारात टाकण्यात आलं. ही गोष्ट त्या व्यक्तीच्या शेजाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने या विरोधात पोलिसांत तक्रार केली. आयव्हीआरआयचे जॉईंट डायरेक्टर डॉ. केपी सिंह यांनी या अहवालाबद्दल सांगितलं की, 25 नोव्हेंबर रोजी या उंदराच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पण या उंदराची फुफ्फुसं आधीच निकामी झाली होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडचण येत होती. या उंदराच्या फुफ्फुसांमध्ये गटारीच्या पाण्याचा कोणताही अंश सापडला नाही. त्याला लिव्हर इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे त्याचा श्वास गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला.
उंदराच्या या पोस्टमॉर्टम अहवालानंतर मात्र ज्या व्यक्तीवर उंदीर मारण्याचा आरोप करण्यात आला होता, त्याने सुटकेचा निश्वास टाकला आहे.