Ayodhya Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांना अद्याप निमंत्रण नाहीच, महाराष्ट्रातून 889 जणांना बोलावणं; अयोध्येत कोण-कोण जाणार?
Ram Temple Pran Pratishtha Invitation : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 889 जणांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
Ayodhya Ram Temple : अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या भव्य मंदिरात (Ram Temple) रामलल्लाची (Ramlala) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. मात्र, अयोध्येतील जागेअभावी खास निमंत्रितांनाच या सोहळ्यासाठी बोलावण्यात आलं आहे. देशभरातील दिग्गज मंडळी, संत-महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं ही उद्घाटन करण्यात आलं आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत निमंत्रित आहे, ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातून एकूण निमंत्रितांची संख्या : 889
महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित व्यक्ती : 534
- कोकण - 397 जण
- पश्चिम महाराष्ट्र - 84 जण
- मराठवाडा (देवगिरी) - 17 जण
- विदर्भ - 36 जण
महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत - 355
- कोकण - 74
- पश्चिम महाराष्ट्र -124
- मराठवाडा (देवगिरी) - 80
- विदर्भ - 77
साडेतीनशे VVIP ना निमंत्रण
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही. त्याशिवाय शरद पवार यांना अजूनही निमंत्रण पोहचलेले नाही. लवकरच या सर्वांना निमंत्रण पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
15-22 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरातील वेळापत्रक (Ram Mandir inauguration 2024 full schedule)
- 15 जानेवरी 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती म्हणजेच श्री रामाच्या बालस्वरूपाची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
- 16 जानेवारी 2024 : या दिवसापासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील.
- 17 जानेवारी 2024 : या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
- 18 जानेवारी 2024 : या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.
- 19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.
- 20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल.
- 21 जानेवारी 2024 : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला 125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल.
- 22 जानेवारी 2024 : या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.
- 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.