(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Atiq Ahmed Killed: उत्तर प्रदेशात 12 सेकंदांत दोन हत्या; एक अतिक, अशरफची अन् दुसरी... : कपिल सिब्बल
Atiq Ahmed Killed: ज्येष्ठ विधीतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशात 12 सेकंदांत दोन हत्या झाल्यात, एक अतिफ आणि त्याच्या भावाची आणि दुसरी कायदा आणि सुव्यवस्थेची असं ते म्हणाले आहेत.
Atiq Ahmed Killed: प्रयागराजमध्ये कडक बंदोबस्तात अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची खुलेआम हत्या करण्यात आली. दोन्ही गँगस्टरच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशसह देशभरात खळबळ उडाली. अतिक आणि अशरफ दोघांच्याही हत्येनंतर देशभरातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. योगी सरकारवर विरोधी पक्ष सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच ज्येष्ठ विधीतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यांनी याप्रकरणावरुन थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये 12 सेकंदात दोन हत्या झाल्यात. पहिली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अन् दुसरी कायदा आणि सुव्यवस्थेची.
दोघेही प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये प्रदीर्घ काळाच्या चौकशीनंतर वैद्यकीय तपासासाठी पोहोचले होते. त्याचवेळी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या करण्यात आली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रसारमाध्यमांनी अतिकशी बातचित केली. तेव्हाच तिन हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे तिघेही प्रसारमाध्यमांच्या रुपात आले होते, असे पोलिसांनी सांगितलं. अतिक आणि अशरफ यांनी केलेल्या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
गुरुवारीच यूपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम मारले गेले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत अतिक अहमदची हत्या करण्यात आली. शनिवारीच असद आणि गुलाम या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनी अतिक अहमद यांना हत्येपूर्वी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याबाबत विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की, "घेऊन नाही गेले, तर नाही गेलो." दरम्यान, अतीक अहमद यांनी मुलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण त्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही.
प्रकरण नेमकं काय?
गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली. यानंतर तिन्ही आरोपींना स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एखाद्या चित्रपटात शोभेल असं हत्येचं आणि त्यानंतरच्या गोळीबाराचं भयानक दृष्य कॅमेराबंद झालं आहे. अतिक आणि अशरफ यांना जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :