Mumbai Rain : मुंबईतील हवामान विभागाचे रडार अजूनही नादुरुस्तच, पुढील 7 दिवसांत नवे रडार कार्यान्वित होणार, हवामान विभागाची माहिती
Mumbai Rain : तोक्ते चक्रीवादळात बिघाड झाल्यानंतर हवामान विभागाचे रडार बंद झाले होते. परंतु, अद्याप या रडारची दुरुस्ती करण्यात आलेली नसून हे रडार नादुरुस्तच आहे.
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानानंतर धडा न घेता अजूनही मुंबईतील हवामान विभागाचे रडार बंदच आहे. पुढील 7 दिवसांत नवे रडार कार्यान्वित होणार असून अभियंते जुन्या रडारवर काम करत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहोपात्रा म्हणाले, "नव्या रडारवरुनच आम्ही अचूक माहिती देत आहे. हवामान अभ्यासक आणि सर्वांसाठी हे रडार पुढील 7 दिवसानंतर उपलब्ध होणार आहे. डॉपलर रडार जरी बंद असले तरी मुंबईतील 60 ठिकाणींवरील पावसाच्या नोंदी आणि अचूक अंदाज देत आहे. जुन्या रडारच्या दुरुस्तीबरोबरच नवं सी1 रडार देखील लवकरच कार्यान्वित होणार आहे."
कोणत्या ढगांमध्ये पाणी आहे, कोणत्या ढगांमध्ये बाष्प आहे तसेच ढगांची दिशा काय आहे? त्या ढगांमुळे परिसरात पावसाची तीव्रता कशी असेल आणि किती मीमी पाऊस प्रति तास कोसळू शकतो याचा अंदाज डॉपलर रडारच्या माध्यमातून घेण्यात येतो. मात्र, रडार कार्यान्वित नसल्यानं कालच्या पावसाचा अचूक अंदाज 4-6 तास आधी बांधण्यास अडचणी आल्या. पाऊस सुरु झाल्यानंतर मुंबईतील ऑरेंज अलर्ट, रेडमध्ये बदलण्यात आला.
मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर पुढील चार-पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने 13 जूनपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' म्हणजे सावधानतेचा इशारा कायम आहे.
रडार कधी कधी बंद होते?
- ओखी चक्रीवादळ 2017
- जून, जुलैमध्ये झालेला मुसळधार पाऊस 2019
- निसर्ग चक्रीवादळ 2020
- तोक्ते चक्रीवादळ 2021
काल (9 जून) पहिल्याच दिवशी पाऊस मुंबईचे जनजीवन विस्कळीत करणारा ठरला. मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती.
ऐन तोक्ते चक्रीवादळाच्या तोंडावर मुंबईच्या रडारमध्ये बिघाड झाल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती. त्यानंतर आता मुंबईला 5 नवीन रडार मिळणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आली होती. आता या घटनेला महिना होत आला असून अजूनही रडार दुरूस्तीचे काम सुरु आहे.