(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Juhi Chawla Vs 5G Case : 20 लाखांचा दंड आणि हायकोर्टाने फटकारल्यानंतर जुही चावला म्हणाली...
5G रेडिएशन विरोधातील याचिकेवरुन अभिनेत्री जुही चावलाला दिल्ली हायकोर्टाने फटकारलं आणि सोबतच 20 लाखांचा दंडही ठोठावला. आता जुहीने एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात 5G टेक्नॉलॉजीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरुन हायकोर्टाने तिला फटकारलं आणि सोबतच 20 लाखांचा दंडही ठोठावला. आता जुहीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. जुहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
जुही चावलाने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, "नमस्कार, काही दिवसात गोंधळ एवढा वाढला आहे की मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही. या गोंधळात मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज कदाचित विसरलो आणि तो असा होता की आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही याचं स्वागत करत आहोत. तुम्ही ते नक्की आणा. आम्ही फक्त एवढंच बोलत होतो की, 5G सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं."
Hear 👍 pic.twitter.com/S0ypfWmS2E
— Juhi Chawla (@iam_juhi) June 9, 2021
ती पुढे म्हणाली की, "आमचं सांगणं केवळ एवढंच आहे की या टेक्नॉलॉजीबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सगळे निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला केवळ एवढंच जाणून घ्यायचं आहे की, ही टेक्नॉलॉजी लहान मुलं, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे."
5G टेक्नॉलॉजीच्या चाचणीवरुन चर्चा रंगली आहे. काही जण या टेक्नॉलॉजीचे फायदे सांगत आहेत तर काही जण ही टेक्नॉलॉजी हानीकारक असल्याचा दावा करत आहेत. याचदरम्यान जुही चावलाने 5G विरोधात आवाज उठवत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.