Assam-Mizoram Conflict : आसामचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मिझोरममध्ये गुन्हा दाखल; वाद पेटण्याची शक्यता
Assam-Mizoram Conflict : आसाम पोलिसांनी मिझोरम पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता मिझोरमने त्याला जशास तसं उत्तर देत थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एजवाल : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सुरु असलेला सीमावाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. काल आसाम पोलिसांनी घेतलेल्या अॅक्शनला मिझोरम पोलिसांनीही जशास तसं उत्तर दिलं असून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, राज्यातील चार वरिष्ठ अधिकारी आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्यात झालेल्या हिंसेवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक जॉन एन. यांनी सांगितलं की आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबतच इतरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि हिंसक कृत्यात सामिल असल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये आसामच्या 200 हून अधिक अज्ञात पोलिसांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
आसाम पोलिसांची कारवाई
मिझोरम पोलिसांच्या या कारवाई आधी आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या कोलसिब जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना आसामच्या धोलाई पोलीस ठाण्यात सोमवारी हजर राहण्याचे समन्स जारी केलं आहे.
काय आहे आसाम-मिझोरमचा सीमावाद?
आसाम आणि मिझोरमध्ये हे पूर्वी एकाच राज्याचा भाग होते. तेव्हा मिझोरम हा आसामचा लुशाई हिल्स नावाचा एक जिल्हा होता. 1972 मध्ये मिझोरम आधी केंद्रशासित प्रदेश आणि 1987 मध्ये राज्य म्हणून घोषित झालं. आसामच्या बराक घाटीतील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांच्या आणि मिझोरमच्या आयझॉल, कोलसिब आणि मामित या जिल्ह्यांची 164 किमीची सीमा लागून आहे. गेल्या वर्षी, ऑगस्ट 2020 मध्ये या दोन राज्यातील नागरिकांमध्ये सीमेवरुन वाद झाला होता.
आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्ये पर्वतीय भागाची असून या राज्यांतील नागरिकांमध्ये जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांवरुन नेहमी वाद होतो. नुकतंच आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली आणि त्यांना तिथून हाकलवून लावलं होतं. त्यामुळे या दोन्ही राज्यांत सीमावादावरुन नव्याने वाद निर्माण झाला आहे.
या दोन राज्यातील नागरिक आणि पोलिसांमध्ये 26 जुलैला झालेल्या हिंसाचाराच्या आधी एटलांग नदीच्या परिसरातील आठ झोपड्यांना आसाम पोलिसांनी आग लावल्याचा आरोप मिझोरमच्या पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मिझोरमच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचं सांगण्यात येतंय. तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आसाम पोलिसांकडून करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
- Assam-Mizoram Conflict : मिझोरममध्ये जाऊ नका; आसामच्या सरकारचा नागरिकांना सल्ला
- Assam-Mizoram Conflict : आसाम आणि मिझोरममध्ये सीमावादावरुन रक्तपात, गोळीबारात सहा पोलीस ठार तर 50 जखमी
- Assam-Mizoram Conflict : आसाम- मिझोरममधला सीमावाद इतक्या टोकाला का गेला? दोन राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस एकमेकांसमोर