Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन मंजूर
Antilia Bomb Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मांना जामीन प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Antilia Bomb Case: व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी (Antilia Bomb Case) अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Ex-Mumbai Cop Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी (23 ऑगस्ट) जामीन मंजूर केला आहे. याआधी मुंबई हायकोर्टानं प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा देत नियमित जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन त्यांना दिला गेला होता. त्यानंतर प्रदीप शर्मा पुन्हा सरेंडर झाले होते. अशातच आता याच कारणावरुन त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे.
प्रदीप शर्मा यांना जून 2021 मध्ये झालेली अटक
अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. आपला माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मांवर करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. ही एसयूव्ही ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर काहीच दिवसांत मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी ठाण्यातील खाडीतून सापडला होता. याप्रकरणी प्रदीप शर्माला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.
माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते आणि दावा केला होता की, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. तर प्रदीप शर्मा हेच मनसुख हिरेन यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचा एनआयएचा आरोप आहे. अंबानी कुटुंबाला घाबरवण्याचा कट मनसुख हिरेन यांना माहीत होता, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.
प्रदीप शर्मा यांच्यावर मनसुख हिरेनच्या हत्येचा आरोप
एनआयएनं म्हटलं होतं की, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचाही हात होता. अंबानी कुटुंबासह इतरांना धमकावण्याचा जो कट रचण्यात आला होता. याच कटाची संपूर्ण माहिती मनसुख हिरेन यांना माहित असल्यानं त्यांची हत्या करण्यात आली. मनसुख हिरेन यांना अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारबाबत संपूर्ण माहिती होती. तसेच, आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन यांच्यामार्फत केलेल्या कृत्याचा पर्दाफाश होण्याची भिती होती, त्यामुळेच हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असा दावा एनआयएनं केला होता.