भारत-चीन सैन्यादरम्यान 17 जुलैला होणार महत्त्वाची बैठक, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
India China LAC Tension: भारत आणि चीनचे कॉर्प्स कमांडर 17 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
India China LAC Tension: भारत आणि चीनचे कॉर्प्स कमांडर 17 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या हवाई क्षेत्रात भारत आणि चीनच्या हवाई दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. एलएसीच्या विवादित क्षेत्रावर तोडगा काढण्यासाठी 16 व्या फेरीची ही बैठक रविवारी चीनच्या सीमेवरील पूर्व लडाखमधील चुशुल-मोल्डो मीटिंग पॉईंटवर होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक विशेषत: पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या पेट्रोलिंग पॉईंट (PP) क्रमांक 15 मधील समस्या सोडवण्यासाठी केली जाईल. पीपी 15 वर दोन देशांपैकी प्रत्येकी एक प्लाटून गेल्या दोन वर्षांपासून आमनेसामने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीपी 15 व्यतिरिक्त डेपसांग प्लेन आणि डेमचोक सारख्या वादग्रस्त क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा मुद्दाही भारताच्या बाजूने उपस्थित केला जाऊ शकतो. भारताच्या बाजूने लेह येथील14 व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता या बैठकीत सहभागी होतील. तर चीनच्या बाजूने मेजर जनरल यांग लिन हे सहभागी होतील.
चीनने हवाई हद्दीचे केले उल्लंघन
दरम्यान, गेल्या महिन्यात चीनने अक्साई चीन परिसरात मोठा हवाई सराव केला होता. यादरम्यान चीनची लढाऊ विमाने भारताच्या हवाई क्षेत्राच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्यादरम्यान भारतीय हवाई दलाने लडाखमधील हवाई तळावरून लढाऊ विमानांची स्क्रॅम्बल केली. मिळालेल्या माहितीनुसार, नंतर भारताने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याबद्दल चीनकडे निषेधही नोंदवला. चिनी हवाई दलाच्या सरावानंतर भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या हवाई क्षेत्रात हवाई गस्त वाढवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: