TET Examination: अमित शाह, ममता बॅनर्जी यांनी उत्तीर्ण केली TET परीक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
West Bengal TET Examination: पश्चिम बंगालमध्ये 2014 वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अमित शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
West Bengal TET Examination: अमित शाह (Amit Shah), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष या राजकारणातील धुरिणांची पुन्हा चर्चा सुरू आहे. ही चर्चा पश्चिम बंगालमधील (West Bengal) राजकीय हिंसाचार, कुरघोडीमुळे नसून शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुणवत्ता यादीमुळे (Teachers Eligibility Test) चर्चेत आहे. या नेत्यांनी 2014 मध्येच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये मागील काही महिन्यांपासून टीईटी घोटाळा चर्चेत असून ममता बॅनर्जी सरकारवर विरोधकांनी आरोप केले आहेत. डाव्यांनी या घोटाळ्याविरोधात आंदोलनही पुकारले आहे.
पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाने 2014 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची (TET 2014) गुणवत्ता यादी समोर आली आहे. या यादीत अमित शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. या गुणवत्ता यादीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 92 गुण मिळाले आहेत. तर, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना 98 गुण मिळाले. पश्चिम बंगालचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांना 100 गुण मिळाले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सृजन चक्रवर्ती यांना 99 गुण मिळाले असल्याचा दावा एका ट्वीटमधून भाजप नेत्यांनी केला आहे.
भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते सुकांता मुझुमदार यांनी एका ट्वीटर युजरचे ट्वीट रिट्वीट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असून भ्रष्टाचार जोरात असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकार हा असला प्रकार कधी थांबवणार असा प्रश्न करताना सामान्य उमेदवारांच्या आयुष्याशी खेळणे बंद करावे अशी मागणी त्यांनी केली.
This is the level of education and assessment in West Bengal. Corruption is high and education and assessment is poor.
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) November 14, 2022
Sad state of affairs. When did @MamataOfficial stop playing with life of candidates? https://t.co/DhyYuoXu48
या यादीत पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाल यांच्या नावाचाही समावेश या यादीत होता. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी म्हटले की, या गुणवत्ता यादीतील उमेदवार खरे असून त्यात कोणत्याही खोट्या नावांचा समावेश नाही. पश्चिम बंगालमध्ये या नावाचे उमेदवार असल्याचेही त्यांनी म्हटले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीतील काही नावे ही पश्चिम बंगालमध्ये सर्वसाधारण नावे आहेत. ही नावे बंगालमध्ये सामान्यपणे आढळतात. त्यामुळे यादीतील नावे सत्य आहेत की बोगस हे पाहण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची आहे. त्यांच्या या तपासातून सत्य माहिती समोर येईल, असे म्हटले जात आहे.