Interfaith Marriages : धर्मांतर न करता केलेला आंतरधर्मीय विवाह बेकायदेशीर; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Allahabad High Court : अशा प्रकारचे विवाह करणाऱ्या आर्य समाज आणि इतर संस्थांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

लखनऊ: धर्मांतर न करता करण्यात आलेले आंतरधर्मीय विवाह हे बेकायदेशीर असतील असा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याशी आर्य समाज मंदिरात विवाह केला होता. तो विवाह न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातील फौजदारी खटला रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला.
याचिकाकर्ता सोनू सहानूर याने त्याच्याविरोधातील फौजदारी खटला रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. आपण ज्या मुलीशी लग्न केलं होतं ती मुलगी आता प्रौढ झाली आहे, आर्य समाज मंदिरात हा विवाह केला होता असा दावा त्याने याचिकेतून केला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे बेकायदेशीर
न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांनी दिलेल्या निर्णयात असं नमूद केलं की अल्पवयीन व्यक्तीचा विवाह करून दिलेला आर्य समाजाचा विवाहप्रमाणपत्र कायदेशीर निकषांचे उल्लंघन करणारा आहे. आर्य समाज संस्था विवाहित जोडप्यांना, विशेषतः अल्पवयीन किंवा धर्मभिन्न व्यक्तींना, ठराविक शुल्कामध्ये विवाहप्रमाणपत्र देत आहेत, ही गंभीर बाब असून अशा प्रकारांचा तपास होणे गरजेचे आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
आर्य समाजसह इतर संस्थांच्या चौकशीचे आदेश
न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले की IPS दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली अशा संस्थांची चौकशी सुरू करण्यात यावी. या चौकशीचा अहवाल 29 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या चौकशीमुळे उत्तर प्रदेशातील अशा संस्थांवर कारवाई होण्याची शक्यता असून, सामाजिकदृष्ट्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीविरुद्ध महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलिस ठाण्यात POCSO कायदा, अपहरण आणि बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून समन्सही बजावण्यात आले आहेत.
Arya Samaj Marriage : आर्य समाज विवाह म्हणजे काय?
आर्य समाज ही सुधारवादी हिंदू चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, ते वैदिक पद्धतीने, सोप्या विधीने विवाह लावतात. यामध्ये दोघेही हिंदू असणे किंवा हिंदू धर्मात धर्मांतर करूनच विवाह करणे आवश्यक असते. अल्पवयीन आणि धर्मभिन्न व्यक्तींना आर्य समाजात विवाह करता येत नाही, असा नियम आहे.
न्यायालयाने याआधीही स्पष्ट केलं होतं की फक्त आर्य समाज मंदिराचे प्रमाणपत्र विवाहाचा पुरावा मानता येणार नाही. अशा प्रमाणपत्राची कायदेशीर वैधता न्यायालयीन साक्षांवर अवलंबून असते.























