Air India Plane Crash Ahmedabad : पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी आला होता नवरा, एअर इंडियाच्या विमान अपघातात गमावला जीव; मन हेलावून टाकणारी घटना
Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू झाला आहे. ते पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आले होते.

Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात (Air India Plane Crash) अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानात बिघाड झाला आणि ते कोसळले. या भीषण दुर्घटनेत अमरेलीमधील वाडिया गावाचे रहिवासी आणि लंडनला स्थायिक असलेले अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आले होते.
अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारती यांचे सात दिवसांपूर्वीच लंडनमध्ये निधन झाले होते.'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, भारती यांची इच्छा होती की, त्यांचं अस्थी विसर्जन अमरेलीमधील त्यांच्या मूळ गावातील तलाव आणि नदीमध्ये करण्यात यावं. अर्जुन हे पत्नीची ही अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते आणि अस्थी विसर्जनानंतर परतीसाठी ते निघाले होते. मात्र, एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एकूण 242 प्रवासी होते. या भीषण अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला, मात्र एक व्यक्ती चमत्कारिकरित्या बचावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
विमान अपघातात आग्रा येथील पती-पत्नीचा मृत्यू
या भीषण अपघातात आग्रा येथील रहिवासी नीरज लवानिया आणि त्यांच्या पत्नी अपर्णा लवानिया यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, हा अपघात कधीच विसरता येणार नाही. आमच्या गावातील सर्वजण खूप दु:खी आहेत. नीरज लवानिया हे अत्यंत चांगले व्यक्ती होते. ते वारंवार गावाला भेट द्यायचे. समाजात त्यांची चांगली ओळख होती, असे परिसरातील नागरिकांनी म्हटले आहे.
अपघातात एक प्रवासी बचावला
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील 11A या सीटवर बसलेले रमेश विश्वकुमार हे अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. या भीषण दुर्घटनेबाबत बोलताना रमेश विश्वकुमार म्हणाले, 'विमानाने टेकऑफ घेतल्यावर अवघ्या 30 सेकंदांतच जोरदार आवाज येऊ लागला आणि काही क्षणांतच विमान कोसळलं. हे सगळं इतकं वेगानं घडलं की काही समजण्याच्या आतच अपघात झाला,' असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा























