मोठी बातमी! एअर इंडिया एक्सप्रेसची 78 उड्डाणं रद्द; आजारी असल्याचं सांगत क्रू मेंबर्स अचानक रजेवर
Air India Express Flight Cancelled: एअरलाईन्सचे वरिष्ठ क्रू सदस्य मोठ्या प्रमाणात आजारी रजेवर गेले आहेत, ज्यामुळे कंपनीला 78 हून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत.
Air India Express Flight Cancelled: मुंबई : आजारपणाचं कारण देत एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express) कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचं विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात असं असं दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवर गेले आहेत. परिणामी 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या 78 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स मोठ्या प्रमाणावर आजारी असल्याचं सांगत रजेवर गेले आहेत. अशा परिस्थितीत ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, जे आज एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणार आहेत, त्यांनी चौकशी करुनच विमानतळावर यावं, असं आवाहन एअर इंडियाकडून प्रवाशांना करण्यात आलं आहे.
More than 70 international and domestic flights of Air India Express from Tuesday night till Wednesday morning have been cancelled after the senior crew member of the airline went on mass 'sick leave'. Civil Aviation authorities are looking into the issue: Aviation Sources
— ANI (@ANI) May 8, 2024
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस गेल्या काही काळापासून केबिन क्रूच्या कमतरतेचा सामना करत आहे. असे अनेक कर्मचारी आहेत, जे टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीवर कथित गैरव्यवस्थापनाचा आरोप करत आहेत आणि निषेधार्थ अचानक आजारी असल्याचं सांगत रजेवर जात आहेत. एअर इंडियामध्ये एक्स कनेक्ट (पूर्वीचे AirAsia India) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही समस्या आणखी वाढली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसकडून निवेदन जारी
एअर इंडिया एक्सप्रेसनं एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, "आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका वर्गानं काल रात्री अचानक आजारी असल्याचं सांगत रजा घेतली आहे. परिणामी फ्लाईटला विलंब झाला आणि काही फ्लाईट्स रद्द झाल्यात. या घटनांमागील कारणं समजून घेण्यासाठी आम्ही क्रू मेंबर्ससोबत बोलत आहोत. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगानं काम करत आहे."
दरम्यान, नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करत आहे. एअरलाईनचं म्हणणे आहे की, ज्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे, त्या सर्व प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल किंवा त्यांचं फ्लाईट दुसऱ्या तारखेला रिशेड्यूल करण्याचा पर्याय असेल. एअर इंडिया एक्सप्रेसनं प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाईटची स्थिती तपासण्याचा सल्लाही दिला आहे.