(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mangalyaan Mission : मंगळयान मिशनचा 'The End'? आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
ISRO Mangalyaan Mission : इसत्रोच्या (ISRO) मंगळयानाचा संपर्क तुटला आहे. आठ वर्ष काम करणाऱ्या मंगळयानाचं (Mangalyaan) इंधनही संपलं आहे.
ISRO Mangalyaan Mission : इसत्रोची (ISRO) मंगळयान मोहीम (Mission Mangal) अखेर संपल्याचं म्हटलं जात आहे. आठ वर्ष काम करणाऱ्या मंगळयानाचा (Mangalyaan) संपर्क तुटला आहे. यासह आठ वर्ष चालणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशन (Mars Orbiter Mission - MOM) अखेर संपली असल्याचं समजलं जात आहे. मंगळयानाचं इंधन संपलं आणि बॅटरीही डाऊन झाली यानंतर मंगळयानाचा संपर्क तुटला. इसत्रोकडून (ISRO) मंगळयान मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. सुरुवातील केवळ सहा महिन्यांसाठी आखण्यात आलेली ही मोही आठ वर्ष चाललं. मंगळयान सलग आठ वर्ष आठ दिवस अवकाशात कार्यरत होतं.
पहिल्याच प्रयत्नात भारताच मंगळावर पाऊल
मंगळयान मोहीम 2013 साली सुरु झाली होती. 5 नोव्हेंबर 2013 रोजी श्रीहरीकोटा येथून मंगळयान अवकाशात झेपावलं. 24 सप्टेंबर 2014 साली मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचलं. मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेसह पहिल्याच प्रयत्नात मंगळ (Mars) ग्रहावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. मंगळयान मोहिमेसाठी 450 कोटी रुपये खर्च आला. आठ वर्षाच्या काळात मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीपर्यंत पोहोचवले. यामुळे शास्त्रज्ञांना संशोधनात मोठा फायदा झाला.
मंगळयानाचा संपर्क तुटला
इसरोने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'मंगळयानमधील इंधन आता पूर्णपणे संपलं आहे. अंतराळयानाची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. इसत्रो मंगळयानाशी असलेला संपर्कही तुटला आहे.' त्यामुळे मंगळयानाची मोहीम जवळजवळ संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान इसरोने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
मंगळयान निश्चित वेळेपेक्षा 16 पट अधिक चाललं
इसत्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळयान त्याच्या नियोजित वेळेपेक्षा 16 पटीनं चाललं. मंगळयान मोहीम फक्त सहा महिन्यांसाठी चालवण्यात येणार होती, मात्र मंगळयानानं आठ वर्ष काम केलं. मंगळयानाने मंगळावरील अनेक फोटो पृथ्वीवर पाठवले आणि डेटाही पोहोचवला ज्यामुळे अंतराळातील जगाविषयी आणि मंगळाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मंगळयानाने केलेलं हे काम केलं आहे जे आजपर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळयानाने केलेलं नाही.