शबरीमाला वाद आणि #MeToo मोहिमेवर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली शबरीमाला परंपरांमध्ये कोणताही हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, असं मत रजनीकांत यांनी व्यक्त केलं.

चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी शबरीमाला मंदिर वादाबद्दल आणि 'मी टू' मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली शबरीमाला मंदिरातील परंपरांमध्ये कोणीही हस्तक्षेप केला नाही पाहिजे, असं मत रजनीकांत यांनी व्यक्त केलं.
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर जोरदार आंदोलनं होत आहेत. "प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी मिळायला हवी याबद्दल दुमत नाही. जेव्हा आपण एखाद्या मंदिराबाबत विचार करतो, त्यावेळी त्या मंदिराच्या काही चालीरिती, परंपरा असतात. ज्यांचं अनेक वर्षांपासून पालन केलं जात असतं. त्यामुळे अशा कोणत्यांही परंपरांमध्ये कोणीही हस्तक्षेप करायला नको, असं माझं नम्र मत आहे", असं रजनीकांत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या शबरीमाला मंदिर प्रवेशाबद्दल दिलेल्या आदेशाचा मान राखला पाहिजे. मात्र दुसरीकडे मंदिराच्या परंपराही राखल्या जाणं गरजेचं असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं.
शबरीमाला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रम्हचारी मानलं जातं. मासिक पाळीमुळे 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात अनेक वर्षांपासून प्रवेश करण्यास मनाई आहे. ही प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होतं आहेत.
दरम्यान, मीटू मोहिमेबद्दलही रजनीकांत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ही मोहीम महिलांच्या हिताची असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं. मात्र याचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे आणि योग्य रीतीने याचा वापर व्हायला हवा, असं मतही रजनीकांत यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
