Masoor Dal : मसूर डाळीच्या साठ्याबाबत तात्काळ माहिती द्या, अन्यथा कारवाई; केंद्र सरकारचा साठेबाजांना इशारा
सरकारनं मसूर डाळीच्या (Masoor Dal) अनिवार्य साठ्याबाबत तात्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Masoor Dal : केंद्र सरकारनं (central government) मसूर डाळीच्या (Masoor Dal) अनिवार्य साठ्याबाबत तात्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) त्यांच्याकडील मसूर डाळीची माहिती अनिवार्यपणे उघड करावी. कोणताही अघोषित साठा आढळल्यास तो साठेबाजी मानला जाईल. त्यानुसार आवश्यक वस्तू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे.
काही कंपन्यांकडून बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न
मसूर डाळीचा कोणताही अघोषित साठा आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारनं साठेबाजांना दिला आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी साप्ताहिक मूल्य आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मसुर डाळीची बफर खरेदी अधिक व्यापक बनवण्याच्या सूचना देखील यावेळी रोहित कुमार सिंह यांनी दिल्या आहेत. किमान हमी भावाच्या जवळच्या किंमतीत उपलब्ध साठा खरेदी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. जेव्हा कॅनडामधून मसूर डाळीची आयात आणि आफ्रिकन देशांमधून तूर डाळीची आयात वाढत असताना काही प्रमुख कंपन्या, ग्राहक राष्ट्राच्या हिताच्या विरोधात बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले. मात्र, सरकार या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सिंह यांनी सांगितलं.
मसूर डाळीचा साठा बाजारात आणण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेणार
दरम्यान, आता सणासुदीचा काल सुरु आहे. या काळात सरकार रास्त दरात सर्व डाळींची उपलब्धता करुन देणार आहे. साठेबाजांनी केलेला मसूर डाळीचा साठा बाजारात आणण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली. ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. भारतीय ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या हिताला ठेच पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास विभाग मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा सिंह यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: