Survey On I.N.D.I.A Alliance : राहुल, केजरीवाल, नितीश की ममता? इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? सर्वेक्षणात लोकांचा कौल काय?
ABP C Voter Survey On I.N.D.I.A Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी कोणता उमेदवार योग्य असेल याबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी (lLok Sabha Election 2024) काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. देशात मुदतपूर्व निवडणुकांपासून 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) अशीही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत विरोधी पक्ष आघाडीची (I.N.D.I.A.) बैठक झाली. ज्यामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार केला.
विरोधकांच्या या बैठकीत विरोधी आघाडी समन्वयक किंवा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर 'सी व्होटर'ने एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण करण्यात आले असून लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाचा दावेदार कोण?
या सर्वेक्षणात इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न करण्यात आला होता. या सर्वेक्षणात आश्चर्यजनक माहिती समोर आली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 29 टक्के लोकांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची निवड केली. तर 9 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले.
याशिवाय 6 टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, 3 टक्के लोकांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, 3 टक्के जणांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, 6 टक्के शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. तर 40 टक्के लोकांनी यापैकी काहीही सांगितले नाही आणि 4 टक्के लोकांना माहीत नसल्याचे सांगितले.
I.N.D.I.A आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार कोण?
स्रोत- सी व्होटर
राहुल गांधी - 29 टक्के
अरविंद केजरीवाल-9 टक्के
नितीश कुमार -6 टक्के
अखिलेश यादव -3 टक्के
ममता बॅनर्जी -3 टक्के
उद्धव ठाकरे - 6 टक्के
यापैकी नाही - 40 टक्के
माहित नाही - 4 टक्के
(विशेष सूचना : सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे देशव्यापी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 2 हजार 188 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. गुरुवारपासून आज दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे. सर्वेचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संभाषणांवर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.)