एक्स्प्लोर
Advertisement
रविवार ठरला घातवार, दिवसभरात 99 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील दोन घटनांमध्ये बारा जणांचा जीव गेला, तर परदेशात आणि देशभरातही विविध घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला.
मुंबई : रविवारी महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटनांमध्ये 95 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय यामध्ये अफागाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे, ज्यात 20 जणांचा जीव गेला. तर महाराष्ट्रातही अपघात आणि धुळ्यातील जमावाच्या हल्ल्याची घटना घडली
दिल्लीत एकाच घरात 11 मृतदेह आढळले
राजधानी दिल्लीची सकाळच धक्कादायक घटनेने झाली. बुराडी भागातील एका घरात 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. या मागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून घटनेची चौकशी चालू आहे. मोक्ष प्राप्तीसाठी या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गडचिरोलीत अपघातात सात जणांचा मृत्यू
सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता, की चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
जिमलगट्टापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोविंदगावाजवळ काल सकाळी 9.30 च्या दरम्यान काळी पिवळी वाहनात घरघुती सामान नेण्यात येत होतं. यावेळी चंद्रपूर पासिंग वाहन सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यामध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातात बलेनोमध्ये असणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जिमलगट्टा प्राथमिक उपकेंद्रात दाखल केल्यानंतर काळी पिवळीमधील वाहन चालक आणि बलेनो वाहनातील दोन लहान बाळंही दगावले.
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 48 जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील नैनीडांडा भागात एक बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
गढवाल मोटर युजर्सची ही बस रविवारी पहाटे सहा वाजता धौन गावाहून रामनगरला निघाली होती. सकाळी 8.45 वाजता पिपलीधौन मोटर मार्गावर ग्वीन गावाजवळ ही घटना घडली. या भागात एका गावात जागरण कार्यक्रम होता. तो आटोपून परतणाऱ्या लोकांच्या या गाडीला अपघात झाला. याव्यतिरिक्त सुट्ट्यांमध्ये गावी येऊन पुन्हा दिल्लीला परतणारे लोकही या बसमध्ये होते. दिल्लीसाठी रामनगरहून दुसरी बस पकडण्यासाठी हे लोक निघाले होते. रस्त्यापासून खाली 60 मीटर अंतरावर ही बस कोसळली.
धुळ्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू
राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलैला दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.
मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथेही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला.
मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.
अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर आत्मघाती हल्ल्याने हादरलं. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी जलालाबादच्या दौऱ्यावर होते. अधिकाऱ्यांनी या आत्मघाती बॉम्ब स्फोटाची अधिकृत माहिती दिली. हल्ल्याची जबाबदारी अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
बिहारमध्ये दोन घटनेत आठ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये दोन घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला गेलेल्या चार जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरी घटना बिहारमधीलच सहरसा जिल्ह्यात घडली. ड्रेनेजच्या टाकीत गुदमरुन चार जणांचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement