(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1918 मध्ये स्पॅनिश फ्लूपासून बचावले, आता कोरोनावरही मात; दिल्लीतील 106 वर्षांच्या वृद्धाची कमाल
दिल्लीतील एका 106 वर्षीय वृद्धाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. हे आजोबा त्यांच्या 70 वर्षीय कोरोनाबाधित मुलापेक्षाही लवकर बरे झाले. याआधी म्हणजेच 102 वर्षांपूर्वी आलेल्या महामारीतूनही ते बचावले होते.
नवी दिल्ली : दिल्लीच्या राजीव गांधी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात 106 वर्षाच्या वृद्धाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. या वृद्धाचा रिकव्हरी पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या वयातही त्यांचा रिकव्हरी रेट अतिशय वेगवान होता. या वृद्धाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यांचा 70 वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु हा वृद्ध व्यक्ती मुलापेक्षा वेगाने बरं झाला. वृद्धाची पत्नी, मुलगा आणि कुटुंबाचे इतर सदस्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्लीतील पहिला रुग्ण हा रुग्णाचं आणखी एक वैशिष्ट्ये आहे. या वृद्धाने 1918 मध्ये म्हणजेच 102 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूसारख्या महामारीचाही सामना केला आहे. तेव्हा त्यांचं वय अवघं चार वर्ष होतं. आरजीएसएसएचच्या डॉक्टरांच्या मते, हे दिल्लीतील पहिलं प्रकरण आहे, ज्यात रुग्णाने कोरोनासोबतच 102 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू या महामारीचाही सामना केला आहे.
1918-19 मध्ये स्पॅनिश फ्लूची महामारी स्पॅनिश फ्लू हा साथीचा रोग 102 वर्षांपूर्वी पसरला होता. त्यावेळी संपूर्ण जगाची एक तृतियांश लोकसंख्या या साथीच्या रोगात सापडली होती. अमेरिकेतील सेंट्रल ऑफ डीसीज कंट्रोल (सीडीसी) नुसार, 1918 मध्ये पसरलेला स्पॅनिश फ्लू हा आतापर्यंतचा सर्वात भीषण साथीचा रोग होता. एच1एन1 व्हायरसमुळे हा आजार पसरला होता. अमेरिकेत सगळ्यात आधी हा रोग सैनिकांमध्ये आढळला होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, स्पॅनिश फ्लूमुळे जगभरात सुमारे चार कोटी लोकांनी प्राण गमावले होते. त्यावेळी एकट्या अमेरिकेतच या महामारीमुळे सुमारे 6 लाख 75 हजार जणांचा मृत्यू झाला होता. तर आकडेवारीनुसार, संपूर्ण जगभरात या आजाराने जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला, त्याच्या पंचमांश मृत्यू भारतात झाले होते. पहिल्या महायुद्धातून परतलेल्या सैनिकांसोबत हा व्हायरस भारतात आल्याचं म्हटलं जातं.
वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका : डॉक्टर आरजीएसएसएचच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, 106 वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध बरा झाल्याने आम्ही सगळेच आश्चर्यचकित आहोत. कारण या वयात कोरोनाव्हायरसचा धोका सर्वाधिक असतो. या व्यक्तीने जगण्याच्या इच्छाशक्तीमुळेच कोरोनावर मात केली.
एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, "त्यांना स्पॅनिश फ्लूची लागण झाली होती की नाही, हे आम्हाला नेमकं माहित नाही. त्यावेळची कागदपत्रे आम्ही पाहिलेली नाहीत आणि त्यावेळी दिल्लीत फारच कमी रुग्णालयं होती.