Indian Stock Market : भारतीय शेअर मार्केट आता ब्रिटनलाही मागे टाकणार, टॉप 5 देशांच्या यादीत स्थान मिळणार
Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारातील भांडवलामध्ये या वर्षी 37 टक्क्यांची वाढ झाली असून ती 3.46 ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.
Indian Stock Market : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर मार्केट चांगलंच वधारल्याचं दिसतंय. शेअर मार्केटने आता 60 हजारांचा निर्देशांक पार केला असून त्याची वाटचाल आता जगातल्या टॉप 5 शेअर मार्केटकडे सुरु असल्याचं चित्र आहे. भांडवली किंमतीनुसार विचार केला तर भारतीय शेअर मार्केट लवकरच ब्रिटनला मागे टाकण्याची शक्यता आहे.
या वर्षी शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी आली असून भांडवलाचा विचार करता त्यामध्ये 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर मार्केट आता 3.46 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं आहे. ब्रिटनच्या शेअर मार्केटचा विचार करता या वर्षी त्यामध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली असून ते 3.59 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं आहे. भारतीय शेअर मार्केटचा ग्रोथ रेट लक्षात घेता येत्या काळात ते ब्रिटनला मागे टाकून जगातल्या टॉप पाच शेअर मार्केटमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची क्षमता किंवा ग्रोथ पोटेंशिअल जास्त असल्याचं लक्षात येतंय. टेक्नॉलॉजी क्षेत्राचा झालेला विकास आणि नवीन स्टार्ट अप्सची वाढलेली संख्या यामुळे भारतीय मार्केटची भरभराट झाल्याचं दिसून येतंय. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालं होतं.
येत्या तीन वर्षात म्हणजे 2024 पर्यंत भारतीय शेअर मार्केटचे भांडवल हे पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार असल्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये सुरु झालेल्या नव्या आयपीओच्या माध्यमातून येत्या दोन-तीन वर्षात 400 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
- Akasa Airlines : राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा एअर'ला नागरी उड्डाण मंत्रालयाची NOC, पुढच्या वर्षी सेवा सुरु होण्याची शक्यता
- Facebook Stock : काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं
- Paras Defence IPO : पारस डिफेन्स शेअर्समध्ये GPM लिस्टिंगआधी इश्यू प्राईजमध्ये 143 टक्क्यांनी वाढ