(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Pooja Khedkar: तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती, मग नाॉन-क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले?; पूजा खेडकरचे वडील म्हणतात...
IAS Pooja Khedkar: सदर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
IAS Pooja Khedkar पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांची खबर आता थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहचली आहे. या प्रकाराबाबत पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागितला आहे. ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत पूजा खेडकर आयएएस झाल्या. यासाठी त्यांनी आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे. परंतु पूजा खेडकर हिचे वडील निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. त्यामुळे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र संशायाच्या फेऱ्यात अडकले आहे. यावर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप खेडकर काय म्हणाले?
पूजा खेडकर यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्याची तपासणी यूपीएससीने केली आहे. तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल विचारला असता हे प्रमाणपत्र नियमानेच मिळाले आहे, असं दिलीप खेडकर यांनी सांगतिले.
पूजा खेडकरच्या आईची दमदाटी-
पूजा खेडकरांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना ही दमदाटी करण्यात आली. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन असं बोलत पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली, तसेच पोलिसांना गेटबाहेरच उभं केल्याचं दिसून आलं. तसेच बंगल्याला आतमधून कुलूप लावण्यात आलं आहे. ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली. त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं. तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेटबाहेरच उभं केलं.
कोण आहेत पूजा खेडकर? (Who Is Pooja Khedkar IAS)
पूजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रं दाखवून IAS मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.