Prakash Shedge : मागासवर्ग आयोगाकडून होणारे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा; प्रकाश शेंडगेंची मागणी
Prakash Shedge : मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार, आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा असेही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
हिंगोली : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी आणि न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे महत्वाचे आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारने मागासवर्ग आयोगाला (Maharashtra State Backward Class Commission) सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे, शुक्रवारी पुण्यात झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत मराठा समाजासह इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, आता यालाच ओबीसी नेत्यांकडून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण ताबडतोब थांबवा अशी मागणीच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shedge) यांनी केली आहे. तसेच, मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार, आणि ओबीसी समाजाचे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा असेही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
दरम्यान, यावर बोलतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, "हे सगळं भयानक आहे. मागासलेपण तपासा हे कुणी सांगितले, अशी कुणीही मागणी केलेली नाही. तसेच अशाप्रकारे कोणतेही सर्वेक्षण करण्यात यावे हे ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही. अशाप्रकारचे सर्वेक्षण ताबडतोब थांबविण्यात यावे, ओबीसी समाजातून कोणीही पुन्हा आमचे मागासलेपण तपासण्याची मागणी केली नाही. मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यात सध्याच्या ओबीसीत असलेल्या समाजाचे पुन्हा मागासलेपण तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. पण यावर अजून सुनावणी बाकी असून, त्यानंतर जो काही निकाल आहे तो न्यायालयाकडून देण्यात येईल. मात्र, त्यापूर्वीच सरकराने त्याची अमलबजावणी सुरु केली असून, हे सर्वकाही भयानक आहे. त्यामुळे हे ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
मराठा समाजाचे मागासलेपण कितीवेळा तपासणार
तर पुढे बोलतांना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाचे मागासलेपण तुम्हाला पुन्हा तपासायचे असेल तर त्याला आमची कोणतेही हरकत नाही. परंतु त्या अगोदर मागील 10 वर्षांपासून 130 जातींचा सर्वेक्षण करणे बाकी आहे. आधी या 130 समाजाचे मागासलेपण तपासले पाहिजे. मराठा समाजाचे मागासलेपण आता आणखी कितीवेळा तपासणार आहे. आता ही चौथी-पाचवी वेळ आहे, मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याची. त्यामुळे मागासवर्ग आयोग राज्य सरकारच्या हातातलं बाहुल बनत असेल तर त्याला आमचा विरोध असणार आहे, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.
सभा उधळवून लावण्याची भाषा करणाऱ्याला शास तसे उत्तर दिले जाईल
ओबीसीमधील गरीब समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा आधीच प्रयत्न सुरु आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आमचा समावेश सरसकट ओबीसीत करा असा हा प्रकार आहे. त्यामुळे यालाच विरोध करण्यासाठीच सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नयेत अशी मागणी हा गरीब समाज करत असून, यासाठी ही सभा होत आहे. तरीही ही सभा उधळून लावण्याची भाषा होत असेल, तर महाराष्ट्रात हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. तसेच आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांकडून सभा उधळवून लावण्याची भाषा करणाऱ्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: