(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare : डॉक्टर आदिवासी समाजाचे म्हणून त्यांना शौचालय साफ करायला लावलं; सुषमा अंधारेंची खा. हेमंत पाटलांवर टीका
Nanded Hospital Death Case : कितीही पैसा लागू दे, डॉ. वाकोडे यांनी हेमंत पाटलांवर केलेली केस मागे घेऊ नये, हा आदिवासींच्या सन्मानाचा लढा असल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
नांदेड: शासकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. वाकोडे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी शौचालय साफ करायला लावल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आक्रमक झाल्या आहेत. वाईट परिस्थितीतूनही आम्ही शिकून पुढे येतो तेव्हा एखादा मस्तवाल खासदार पुढे येतो आणि निव्वळ आदिवासी समाजाचा डॉक्टर आहे त्यामुळे शौचालय साफ करायला लावण्याची मग्रुरी त्याच्या अंगात येते अशी टीका अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, त्या ठिकाणी वाकोडे नावाच्या डॉक्टर ऐवजी इतर कोणी डॉक्टर असता तर खरंच हेमंत पाटील असे वागले असते का? हेमंत पाटलाच्या अंगात एवढी मस्ती येते कुठून? हेमंत पाटलांनी आमच्या आदिवासी भावाला शौच साफ करायला लावावा, तो डॉक्टर शौच साफ करायला नाही तर नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी झाला आहे. आदिवासी बांधवाला एकटं नाही समजायचं. प्रत्येक आदिवासी बांधवासोबत आम्ही उभे आहोत.
कितीही पैसा लागू द्या परंतु पोलीस केस मागे घेऊ नका असं आवाहन सुषमा अंधारे यांनी डॉ. वाकोडे यांना केलं. तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्याप्रकरणी सुद्धा हेमंत पाटलांचा त्यांनी समाचार घेतला.
नांदेड येथील शासकीय महाविद्यालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावल्या प्रकरणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डीन वाकोडे यांना सुषमा अंधारे यांनी आवाहन केले आहे. कितीही पैसा कोर्टात लागू द्या, कितीही ताकद लागू द्या, परंतु हेमंत पाटलांच्या विरोधात दिलेली पोलिसातील तक्रार मागे घेऊ नका. कारण हेमंत पाटील यांच्या विरोधातील लढा हा राजकारणातील आणि पक्षीय लढा नाही तर तो आदिवासींच्या सन्मानाचा लढा आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हेमंत पाटलांनी राजीनामा दिल्याचं नाटक केलं, राजीनामा दिला आणि व्हाट्सअप र फिरवला गेला. खासदारकीचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्षांकडे दिला जातो अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावलं. एवढंच नाही तर हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल देखील सुनावले होते.
ही बातमी वाचा: