Manoj Jarange Sabha : हिंगोलीत आज मनोज जरांगेंची तोफ धडाडणार; तब्बल अडीचशे एकरवर होणार सभा
Manoj Jarange Sabha : ही सभा 110 एकरवर होणार असून, 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.
हिंगोली : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची आज हिंगोलीमध्ये सभा होणार आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा 110 एकरवर होणार असून, 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती, त्यानंतर आज जरांगे यांची सभा होणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या सभेला जरांगे काय उत्तर देणार हेही पाहणे महत्वाचे असणार आहे.
आजच्या सभेसाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी आणि सभेसाठी येणाऱ्या मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सोबतच वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांचा देखील विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सभेसाठी एक पोलिस अधीक्षक, 3 पोलिस उपाधीक्षक, 67 पोलिस अधिकारी, 471 पोलिस कर्मचारी, 2 आरसीपी, 1 बीडीडीएस पथक, इतर 3 पथके, एसआरपीएफ 1 कंपनी व 250 होमगार्डस् नेमले आहेत. याशिवाय हिगोली शहरात 2 प्लाटून, कळमनुरी 1 सेक्शन, वसमत 1 सेक्शन, औंढा नागनाथ 1 सेक्शन अशी नेमणूक करण्यात आली आहे.
101 तोफांची सलामी देण्यात येणार
सुरुवातीला मनोज जारांगे पाटील हिंगोली येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यावेळी दोन क्रेनच्या माध्यमातून 2 क्विंटलचा हार घालण्यात येणार आहे. तसेच 101 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. 110 एकवर ही सभा पार पडणार असून सभेसाठी 40 बाय 20 व 12 फुट उंचीचे मुख्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 15 फुट उंच पुतळा ठेवण्यात येणार आहे. स्टेज भोवती 50 फुटांचा डि झोन तयार करण्यात आला असून दुसर्या स्टेजवर सभा सुरू होण्यापुर्वी पोवाडे व निवडक मुलींचे भाषण होणार आहेत.
सभेची अशी जय्यत तयरी...
या सभेसाठी 200 भोंगे, आठ डी.जे.बॉक्स, 300 फोकस, सहा ड्रोन कॅमेरे, आठ एलईडी वॉल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निगराणी ठेवण्यासाठी चार टेहळणी टॉवर, सहा मुख्यप्रवेशद्वार असे स्वरूप असणार आहे. सभा सुरळीत पार पडावी यासाठी पाच हजार मराठा सेवक (स्वयंसेवकांची) नियुक्ती केलेली आहे. दोन वेळेस प्रशिक्षण देऊन प्रत्येक स्वयंसेवकांना ओळखपत्र व टिशर्ट दिले जाणार आहे. 50 विविध ठिकाणी या स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व स्वयंसेवकांना सभेच्या एक दिवस अगोदरच मुक्कामी सभास्थळी बोलावण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'जरांगे म्हणाले सभेला टाकून येऊ नका रे...'; प्रशासनाने थेट सभेच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करून टाकलं