Crime : जेवण न देणाऱ्या सासूचा जावयाने घेतला जीव; शेळ्या बांधायचा खुंटा उपटून घातला डोक्यात
Hingoli Crime News: या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत.
Hingoli Crime News: हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) एक धक्कादायक घटना समोर आली असून, दारूच्या नशेत असलेल्या जावयाने आपल्याच सासूची हत्या केली आहे. जेवण मागितल्यावर सासू देत नव्हती. तसेच जावयाचे मुलीसोबत भांडण सुरू असताना सासूही त्याला घालून पाडून बोलायची. त्यामुळे रागाच्या भरात जावयाने शेळ्या बांधायचा खुंटा उपटून सासूच्या डोक्यात घातला आणि त्यात सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दारूच्या नशेत असलेल्या या जावयाने पत्नीलाही मारहाण करून स्वतःच्या मुलीचाही हात मुरगाळला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. तर अजय रमेश सोनवणे (वय 27 वर्षे) असे जावयाचे नाव असून लताबाई नागराव खिल्लारे (वय 55 वर्षे) असे मयत महिलेच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड परिसरात राहणाऱ्या लताबाई खिल्लारे यांच्याकडेच त्यांची मुलगी अर्चना व जावई अजय सोनवणे राहत होता. तर सासूकडेच वास्तव्यास अजय सोनवणे हा आखाडा बाळापूरच्या बाजारपेठेत हमालीचे काम करायचा. दरम्यान पत्नी आणि दोन मुली, एक मुलगा असा त्याचा परिवार आहे. मात्र सुखी संसार सुरू असतानाच त्याला दारूचे व्यसन जडले. दारू पिऊन आल्यावर तो नेहमी पत्नीसोबत वाद घालायचा. दरम्यान 16 एप्रिल रोजी देखील तो दुपारी 2 वाजता दारू पिऊन आला. दरम्यान याचवेळी त्याचा पत्नीसोबत वाद झाला.
जेवण वाढण्याच्या कारणावरून अजयचा पत्नीसोबत वाद सुरु असतानाच तेव्हा मुलीची बाजू घेत लताबाई खिल्लारे यांनी अजयला घालून पाडून बोलत राग व्यक्त केला. त्यामुळे याच अजयला प्रचंड राग आला. तर रागाच्या भरात त्याने शेळीला बांधण्यासाठी लावलेला खुटा उपटून सासूच्या डोक्यात घातला. तसेच बायकोचा आणि स्वतःच्या मुलीचाही हात मुरगाळला. दरम्यान सासू रक्तबंबाळ अवस्थेत पडली असताना अजयने पळ काढला. तर लताबाई यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर अवस्थेत असलेल्या लताबाई यांच्यावर प्रथमोपचार करून नांदेडला पाठवण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली.
जेवण देत नसल्याने घेतला जीव...
दरम्यान सासूची जीव घेतल्यावर अजय पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तसेच अजयला पोलिसांनी सासूला मारण्याचे कारण विचारले असता दोन दिवसांपासून मला जेवण दिले नाही आणि नेहमी घालून पडून बोलत असल्याने मला प्रचंड राग यायचा. त्यामुळेच मी हत्या केली असल्याचं अजय म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
अनैतिक संबंधातून खून करून अपघाताचा बनाव केला, पण... पोलिसांना संशय आला अन् गेम फसला!