Hingoli News : शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना
Hingoli: शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली आहे.
Hingoli Crime News : शेतीच्या वादातून होणारे वाद काही नवीन नसून, अनेकदा यावरुन एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) देखील शेतीच्या वादावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना रविवारी (12 मार्च) उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खून केल्याची कबुली दिली. चंद्रभान यशवंता कोरडे (वय 45 वर्षे) असे मृताचे नाव असून, मारोती यशवंता कोरडे असे हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत चंद्रभान यशवंता कोरडे आणि आरोपी मारोती यशवंता कोरडे नात्याने सख्खे भाऊ भाऊ असून नवलगव्हाण येथील रहिवासी आहेत. दरम्यान काही दिवसांपासून या दोन्ही भावांमध्ये शेतीचा वाद सुरु होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत होत्या. याशिवाय चंद्रभान हे दारु पिऊन शिवीगाळ देखील करत होते. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मारोती याने त्यांचा कायमचाच काटा काढण्याचा कट रचला.
डोके आणि छातीवर दगडाचे घाव
दरम्यान, शनिवारी (11 मार्च) रात्री चंद्रभान हे शेतात जागणीसाठी गेले होते. त्यानंतर रविवारी (12 मार्च) सकाळी ते घर परतलेच नसल्याने त्यांच्य कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा शोध सुरु असतानाच नवलगव्हाण ते सांबा मार्गावर चंद्रभान यांचा मृतदेह वाटसरुंना आढळून आला. त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. चंद्रभान यांच्या डोके आणि छातीवर दगडाचे घाव घातल्याचे दिसून आले. त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने माहिती घेण्यास सुरुवात केली.
शेतीच्या वादातून खून केल्याची कबुली
नवलगव्हाण शिवारातील नवलगव्हाण ते सांबा मार्गावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेहाच्या डोक्यावर आणि छातीवर घाव दिसून आल्याने ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे घटनास्थळी पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरु केला. यामध्ये मारोती यानेच आपल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, शेतीच्या वादातून मी भावाचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.