Hingoli News : वाढत्या तापमानामुळे हिंगोलीत जिल्हा परिषद शाळांची वेळ बदलली, सकाळी 7 वाजता शाळा भरणार
Hingoli News : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Hingoli News : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या (ZP School) वेळेत बदल करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरु राहणार आहेत. दुपारी बारा वाजता सर्व शाळा सोडण्याचे आदेश शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी काढले आहेत. सकाळच्या सत्रात जरी या शाळा भरवल्या जात असतील तरीही आठ तासिका घेण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून उन्हाचा तडाखा (Heat Wave) वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सकाळी सात वाजल्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट
याआधी हिंगोलीत जिल्हा परिषद शाळा सकाळी 9:30 ते दुपारी 4 या वेळेत भरायच्या. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांत हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत शाळा भरवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने काल (28 फेब्रुवारी) सर्व शाळांना दिले. तसंच दुपारी कोणताही वर्ग भरवू नये असंही सांगण्यात आलं आहे. या निर्णयानुसार आज सकाळी सात वाजल्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय निश्चितच चांगला आहे.
यंदा फेब्रुवारीतच तापमान वाढलं
दरम्यान, यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्या. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागांमध्ये कमाल तापमानाने 30 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाचा उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. तर उत्तरेतील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाच्या झळा तर रात्रीच्यावेळी थंडी जाणवत आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरुच आहेत.
VIDEO : Hingoli Summer : उन्हाच्या काहिलीपासून मुलांचा बचाव करण्यासाठी हिंगोलीत शाळांच्या वेळेत बदल
हेही वाचा