![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत..; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला
Farmers : यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
![किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत..; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला Kidney 75 thousand liver 90 thousand eyes 25 thousand Farmers sold organs to pay off bank loans किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत..; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/50d3df63d43d8865ecf0ae3ea5cbf5ce1700719161162737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली : जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी किडनी (Kidney), लिव्हर (Liver), डोळे (Eyes) व इतर अवयव विकत घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोयाबीन (Soybeans) व कापसाला (Cotton) भाव मिळत नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे कोठून आणायचे, यासाठी किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत विक्री काढल्याचे शेतकरी म्हणाले आहेत.
यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असे असतांना सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, सोयाबीन, कपाशी आदी पिकांना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी किडणी 75 हजार रुपये दहा नग, लिव्हर 90 हजार रुपये दहा नग, डोळे 25 हजार रुपये दहा अशा प्रकारे स्वतःचे अवयव विकत घ्या अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदद्वारे केली आहे.
यामुळे अवयव विक्रीचा निर्णय घेतला...
अनेक शेतकऱ्यांनी खाजगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून खरीपात पेरण्या केल्या आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस झालाच नाही. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक अक्षरशः उध्वस्त झाले, तर दुसरीकडे बोंडअळी लागल्यामुळे कापसाच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. थोडंफार पीक पदरी पडत असतांना त्याला देखील योग्य भाव मिळत नाही. सोयाबीन, कापूस उध्वस्त झाला, दुष्काळ पडला, पिक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, अनुदान नाही. अशात पीक कर्ज भरायचे तरी कसे? त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
अवयव खरेदी करून बँकेचे कर्ज फेडा...
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून, आमचे अवयव खरेदी करून आमचे बँकेचे कर्ज परतफेड करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)