हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, महिलेची रुग्णालयासमोर ऑटोमध्ये प्रसुती अन् तिकडे डॉक्टर-कर्मचारी वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभात व्यस्त
Hingoli News : प्रसुतीसाठी महिलेला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं, ते सर्व वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त होते.
![हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, महिलेची रुग्णालयासमोर ऑटोमध्ये प्रसुती अन् तिकडे डॉक्टर-कर्मचारी वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभात व्यस्त hingoli hospital woman gives birth in an auto in front of hospital doctors staff were busy with the farewell ceremony of medical superintendent हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, महिलेची रुग्णालयासमोर ऑटोमध्ये प्रसुती अन् तिकडे डॉक्टर-कर्मचारी वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभात व्यस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/05/4005d442b1cdbab19c5619f66d45800f168597429979793_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली: देशात विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे रोज कुठे ना कुठे धिंडवडे निघत आहेत. कुठे सुविधांचा दुष्काळ तर कुठे डॉक्टरांचा निष्काळजीपणा दिसतोय. असाच एक प्रकार हिंगोलीत घडला असून रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे घडताना रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी मात्र वैद्यकीय अधीक्षकांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त होते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरातील महिलांच्या प्रसूतीसाठी त्याचबरोबर कुटुंबकल्यांच्या शस्त्रक्रियेसाठी शासनाच्या वतीने महिला रुग्णालय उभारण्यात आले आहे. परंतु या महिला रुग्णालयात रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचं उघड झाल आहे. आज अलका मोरे या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. प्रसूती करण्यासाठी नातेवाईकांनी सदरील महिलेला वसमतच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑटोने घेऊन गेले. परंतु रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेमध्ये रुग्णालयातील अधीक्षकांच्या निरोप समारंभात व्यस्त होते. परिणामी संबंधित महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या बाहेरच ऑटोमध्ये झाली.
रुग्णाचे नातेवाईक संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करत होते. परंतु निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मश्गुल झालेले डॉक्टर आणि कर्मचारी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रसुती झालेल्या महिलेला बाळासह काही काळ ऑटोमध्येच थांबावे लागले.
बाळाला लवकर उपचार न मिळाल्याने, बाळाची तपासणी न झाल्याने नवजात बाळाला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे नातेवाईकांनी या बाळाला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून बाळाला आता आयसीयूमध्ये अॅडमिट केले आहे.
महिलांना प्रसूतीसाठी तात्काळ सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी हिंगोलीत विशेष अशा या महिला रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु रुग्णालयातील या गलथान कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आज घडलेल्या या प्रकाराची जिल्हा आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कार्यालयीन वेळेत अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करणे चुकीचा असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितलं. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना तात्काळ नोटीस बजावली असून त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक मंगेश टेहरे यांनी दिली आहे.
आता या प्रकरणी आरोग्य विभाग डॉक्टरवर कारवाईचे कागदी घोडे नाचवणार की प्रत्यक्षात कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)