Gadchiroli : माओवाद्यांनीच आपल्या सहकाऱ्याला संपवलं; गडचिरोली जिल्ह्यातील घटना
मृतक माओवादी दिलीप हिमाची हा 2012 पासून नक्षल चळवळीत सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडे आहे. दिलीप हिमाची या आधी नक्षल कमांडर पवन हिमाची याचा सुरक्षारक्षक देखील राहिला आहे.
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा येथे आज सकाळी माओवाद्यांकडून आपल्याच दलममधील सक्रिय माओवाद्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. जंगलात मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. घटनेबद्दल स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार गर्देवाडा-मर्दकुही रस्त्यावर गर्देवाडा गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर दिलीप उर्फ नितेश गज्जू हिचामी याचा मृतदेह जंगलात फेकलेल्या अवस्थेत आढळून आला. दिलीप हा सक्रिय माओवादी असल्याची माहिती आहे. त्याची हत्या माओवाद्यांनी केल्याचे उघड झाले आहे.
माओवाद्यांनी हत्येनंतर मृतकच्या छातीवर एक चिठ्ठी चिकटवली आहे. त्यानुसार मृतक हा झुरे गावातील असून दलम प्रोफाइल नुसार कंपनी 04 मधून टिपगड LOS मध्ये सक्रिय होता. यासोबतच मृतक माओवादी दिलीप हिमाची हा 2012 पासून नक्षल चळवळीत सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणे कडे आहे. दिलीप हिमाची या आधी नक्षल कमांडर पवन हिमाची याचा सुरक्षारक्षक देखील राहिला आहे.
पहिलीच घटना!
माओवाद्यांकडून सक्रिय माओवाद्याची हत्या करण्याची ही चळवळीच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. मागच्या काही काळात झालेल्या एन्काऊंटरनंतर माओवादी विचलित झाले आहे. या घटनेनंतर असे लक्षात येते की माओवाद्यांचा आपल्याच दलम मधील दुसऱ्या माओवाद्यांवर विश्वास राहिलेला नसल्याचे नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख (DIG) संदीप पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा