जीव मुठीत धरून अवघडलेल्या अवस्थेत नदी ओलांडली, ॲम्ब्यूलन्सच्या वाटेकडे डोळे लावून गर्भवती अनेक तास बसून राहिली शेवटी...
पावसाळा सुरू झाल्यानंतर ही पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने गुंडेनूर नदीच्या पलीकडे बिनागुंडा आणि पंचक्रोशीतील अनेक गावातील गावकऱ्यांना गुंडेनूर नदी धोका पत्करून पायी पार करावी लागत आहे..

Gadchiroli: पावसाळ्यात नद्या ओसंडून वाहत असताना गडचिरोली जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी अवघडलेल्या अवस्थेत नदी पार करावी लागली. नदीवर पूल नसल्यामुळे जीव मुठीत धरून ती महिला पाण्याच्या प्रवाहातून चालत आली, मात्र नदी पार केल्यानंतरही एम्ब्युलन्सच्या वाटेकडे डोळे लावत ती अनेक तास रस्त्यावर बसून एम्ब्युलन्सची वाट पाहत होती. अखेर जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते तिथून जात असताना त्यांनी तिची दखल घेतली आणि आपल्या वाहनातून तिला सुरक्षित लाहेरी आरोग्य केंद्रात पोहोचवलं. ही घटना भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावातील आहे.
गुंडेनूर नदीवर पूल बांधण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र आजतागायत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढतो आणि नाव (डोंगा) चालवणेही अशक्य होते. परिणामी, बिनागुंडा आणि परिसरातील अनेक आदिवासी गावकऱ्यांना रुग्णसेवेसाठीही धोका पत्करून नदी पायी पार करावी लागते.
नेमकं काय घडलं?
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावातील गर्भवती महिला पावसामुळे वाढलेल्या गुंडेनूर नदीचा प्रवाह अवघडलेल्या अवस्थेत पायी ओलांडून रस्त्यावर आली. गावात जाण्यासाठी कोणताही पूल नसल्याने एम्ब्युलन्स पोहोचू शकत नव्हती. नदी पार केल्यानंतर महिलेने आरोग्य विभागाशी संपर्क केला, मात्र अनेक तास वाट पाहूनही एम्ब्युलन्स आलीच नाही.सकाळपासून दुपारपर्यंत ती महिला रस्त्यावर हतबल होऊन बसून होती. अखेर जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते त्या भागातून जात असताना त्यांना गर्भवती महिला बसल्याचं दिसलं. त्यांनी तत्काळ आपल्या वाहनातून तिला जवळील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप पोहोचवले.
या दोन्ही गावा दरम्यान वाहणाऱ्या गुंडेनूर नदीवर गेले अनेक वर्ष पुलाचं बांधकाम सुरू आहे.. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर ही पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने गुंडेनूर नदीच्या पलीकडे बिनागुंडा आणि पंचक्रोशीतील अनेक गावातील गावकऱ्यांना गुंडेनूर नदी धोका पत्करून पायी पार करावी लागत आहे... एरवी नदीमध्ये डोंगा म्हणजेच छोटी नाव चालवली जाते.. मात्र सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिथून डोंगा चालवणे शक्य नाही.. त्यामुळे परिसरातील ग्रामीण आदिवासींना धोका पत्करून नदी पार करावी लागते आणि जवळच्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पायी यावे लागते..
हेही वाचा























