(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli: असा मास्तर होणे नाही! पगार लाखात आणि दीड हजारात स्वत:च्या जागी विद्यार्थीनीला ठेवले शिकवायला
शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार आत पालघरनंतर, गडचिरोलीत उघड झाला आहे.
गडचिरोली : शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. शाळा (School) ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. दर्जेदार शिक्षणामुळे दर्जेदार विद्यार्थी घडतात. आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवून खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवतात. परंतु गडचिरोलीमधील (Gadchiroli) प्रकार या सगळ्याला हरताळ फासणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील चरवीदंड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाने आपल्या जागी शैक्षणिक घडे गिरवण्यासाठी चक्क रोजंदारीवर एका विद्यार्थिनीची नेमणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्राक मोठी खळबळ उडाली असून अशा कर्तव्यकसूर करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला पाहायला मिळत आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार आत पालघरनंतर, गडचिरोलीत उघड झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची मुख्यालयापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे शिक्षक सुशील आडीकने यांनी चक्क रोजंदारी विद्यार्थीनीला आपल्या जागी शिकविण्यासाठी ठेवल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
दीड हजारात स्वत:च्या जागी विद्यार्थीनीला ठेवले शिकवायला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरवीदंड येथे पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षक हे शाळेत येतच नाही तर मग हे विद्यार्थी शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.आदिवासी बहुल असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुशील आडिकणे यांनी चरवीदंड येथील एका बारावीचे शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींना 1500 रुपये महिन्याप्रमाणे शिकवायला ठेवले. शिक्षकांनी एका बोगस शिक्षकाची नियुक्ती या शाळेत केली असल्याचे दिसून आले यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे शिक्षक आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अथवा येत सुद्धा नाहीत अशीही तक्रार आहे. या आधीच्या अशाच प्रकरणात दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. होते.आता या ताज्या प्रकरणात काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वत:च्या जागी निवृत्त शिक्षक ठेवला, शाळेत विद्यार्थी पत्ते खेळत बसले
तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या (Student) हाती पुस्तकांऐवजी जुगाराचे (Gambling) पत्ते असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.वर्गातच विद्यार्थी चक्क पत्ते खेळत असल्याचे फोटो समोर आले आहेत. इतकंच नव्हे तर या शाळेतील मूळ शिक्षकांनी मजुरीवर शिक्षक नेमल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला पाहायला मिळत आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे.