(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फ्लिपकार्टच्या मते नागालँड भारताच्या 'बाहेरचा प्रदेश', देशभरातून झालेल्या टीकेनंतर मागितली माफी
नागालँडला हा भारताच्या बाहेरचा भाग असल्याचं सांगत फ्लिपकार्ट नव्या वादात.यावरुन टीकेचा भडिमार होताच आपली चुक स्वीकारत माफी मागितली.
नवी दिल्ली: कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( CAIT ) ने ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट विरोधात लवकरच देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नागालँडला भारताच्या बाहेरचा भाग असल्याचे सांगितले होते. यावरून सोशल मीडियात मोठी खळबळ उडाली. CAIT सांगितले की ते या मुद्द्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपस्थित करणार आहेत. त्या ट्विटला डिलीट केले म्हणून फ्लिपकार्टला माफ केले जाऊ शकत नाही. भारतात राहून देशातील एका राज्याला देशाच्या बाहेरचा हिस्सा सांगणे हा अक्षम्य अपराध आहे. त्यांच्या या कृत्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली.
या संघटनेचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की फ्लिपकार्टचे हे कृत्य अत्यंत आश्चर्यकारक आणि आक्षेपार्ह आहे. नागालँडला भारताच्या बाहेरचा भाग असल्याचं सांगून त्यांनी नागालँड सहित सर्व ईशान्येकडील राज्यांचा आणि भारताचा अपमान केला आहे. आज त्यांनी नागालँड हा भारताच्या बाहेरचा भाग असल्याचं सांगितले, उद्या ते लेह लडाखबद्दलही असेच सांगू शकतात. फ्लिपकार्टने भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलंय आणि आम्ही ते सहन करू शकत नाही.
ते पुढे असेही म्हणाले की यासारख्य़ा गंभीर आणि चुकीचे वक्तव्य जे केवळ शत्रू राष्ट्रच करू शकते, त्याला आम्ही कोणतीही माफी करू शकत नाही. फ्लिपकार्टने हे वक्तव्य त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केलं आहे. त्यामुळे त्याला व्यक्तिगत स्वरूपात समजले जाऊ शकत नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण काही दिवसांपूर्वी कोहिमाच्या एका ग्राहकाने फ्लिपकार्टला नागालँडमध्ये डिलिव्हरी का देत नाही असा प्रश्न विचारला होता. त्यावर फ्लिपकार्टने याचे कारण सांगितले होते. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फ्लिपकार्टने ट्विट करताना सांगितले की आम्ही भारताच्या बाहेर आमची सेवा पुरवत नाही. याबद्दल आम्हाला क्षमा करा.
नंतर त्यांनी त्यांचे हे ट्विट त्यांच्या अकाउंटवरून काढून टाकले परंतु तोपर्यंत अनेकांनी त्याचे स्क्रिनशॉट काढून ते व्हायरल केले होते.
त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी फ्लिपकार्टने माफी मागितली. त्यात त्यांनी म्हंटले आहे की या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही नागालँडसोबतच संपूर्ण देशभरात आमची सेवा कशाप्रकारे पुरवता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला वर्तमानात आपल्याला सेवा उपलब्ध करून द्यायला आनंद वाटेल.