(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhule Crime : धुळ्यातील सांगवी गावातील परिस्थिती नियंत्रणात, 13 जणांना अटक, सीआरपीएफसह पोलीस फौजफाटा तैनात
Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील सांगवी गावात तणाव निवळला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिरपूरमधील सांगवी गावात (Sangavi Village) दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर दगडफेक आणि गाड्याची तोडफोड झाली. याप्रकरणी दीडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 65 जणांची ओळख पटली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरु असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
आदिवासी क्रांती दिनाचे (World Trible Day) पोस्टर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने गुरुवारी शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांगवी गावात दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत 12 जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सांगवीतील जोयदा रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो संतप्त जमावाने दुसऱ्या समुदायावर दगडफेक केली. पोस्टर फाडणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली. यातून तणाव वाढून गावात काही ठिकाणी जोरदार दगडफेक सुरु झाली. काही टपऱ्या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला.
यासोबतच काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या, मात्र, यावेळी होणारी मोठी दुर्घटना सांगवी पोलिसांनी हाणून पाडली. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, धुळे येथून एसआरपी दंगल नियंत्रण पथक जादा पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. यासोबतच सांगवी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून या दगडफेकीत अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यातील तीन जणांना शिरपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यात लक्ष्मण भिल, शिवदास भिल, सुभाष विजय सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात....
दोन गटात झालेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांचा फौजफाटा सांगवीत दाखल झाला. दंगलीची पाहणी केल्यानंतर आमदार काशीराम पावरा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार महेंद्र माळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एका बाजूने दगडफेक सुरु झाली. दगडफेकीत आमदार काशीराम पावरा आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या. याप्रकरणी दीडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 65 जणांची ओळख पटली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरु असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
इतर महत्वाची बातमी :