Navratri 2023 : रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात; देवीच्या मूर्तीच्या किमतीत वाढ, ग्राहकांची खरेदीकडे पाठ
Dhule Navratri 2023 : देवीच्या मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांनीही काही प्रमाणात खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे मूर्तीकार चिंतेत आहेत.
धुळे : आदिशक्ती देवीचा नवरात्रोत्सव (Shardiya Navratri 2023) रविवारपासून घटस्थापना होऊन नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी वाढली आहे. धुळे शहरातील बाजारपेठेत देवींच्या मूर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहे. नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कारागिरांची देखील लगबग सुरू असून तयार झालेल्या मूर्त्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या असून, नवरात्र उत्सव सार्वजनिक मंडळांचे मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात देवीच्या जागरा बरोबरच उत्साहाची उधळण पाहायला मिळणार आहे यात शंकाच नाही. मात्र ज्या उत्सवाची वर्षभर मूर्ती बनवणारे हात म्हणजेच देवीचे मूर्ती बनवणारे कारागीर आतुरतेने वाट बघत असतात. त्याच मूर्ती आता ग्राहकांची वाट बघत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
नवरात्र उत्सवामध्ये धुळे जिल्ह्यात मूर्ती बनवणारे कारागीर मोठ्या उत्साहाने देवीच्या आकर्षक आणि उत्कृष्ट अशा मूर्त्या बनवत असतात. अशाच मूर्त्या यावर्षी देखील बनवण्यात आल्या आहेत. मात्र पीओपीवर लावण्यात आलेला कर तसेच कलरवर देखील जीएसटी लावण्यात आल्यामुळे मूर्तींच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून यंदाची दरवर्षी होणारी गर्दी मात्र कुठेतरी कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे मूर्ती बनवणाऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे. इतका पैसा खर्च करून मूर्तीसाठी लावलेला खर्च देखील निघत नसल्याचे मूर्तिकारांकडून सांगितले जात आहे.
राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दांडीयाचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्यावतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
नवरात्रोत्सव मंडळांना परवानगीसाठी 'एक खिडकी योजना'
दरम्यान, मुंबईमध्ये 1200 हून अधिक नवरात्रोत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरीत्या उत्सवासाठी परवानगी घेतात. नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मुंबई महापालिकेच्यावतीने एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येणार आहेत. बिगर व्यावसायिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ. केवळ 100 रुपये अमानत रक्कम आकारण्यात येणार आहे. दुर्गामूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, दिवे, शौचालय, निर्माल्य कलश व्यवस्था करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: