(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhule News : दिवाळीचा सण तोंडावर, धुळ्यात कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Dhule News : कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी धुळे जिल्ह्यतील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यात (Dhule District) यंदा अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड (Cotton Cultivation) करण्यात आली होती. मात्र, कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून (Cotton Farmers) नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे, मात्र अद्यापही कापूस घरातच पडून असल्याने सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे
धुळे जिल्ह्यात (Dhule) कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा खरीप हंगामात (Kharip Season) तब्बल अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती, मात्र जिल्ह्यात अत्यल्प झालेला पाऊस आणि वातावरणातील बदलाचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दुसरीकडे फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव सध्या कपाशीला मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच दिवाळीचा (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून चांगला भाव मिळाल्यास दिवाळीचा सण साजरा करता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र अद्यापही कापसाच्या भावाबाबत शासनस्तरावरून कुठलाच निर्णय झालेला नाही. यामुळे दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी चांगला भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
धुळे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असताना मात्र कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकर्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे. त्यातच पुन्हा दरात घसरण झाली आहे. दर सध्या सात हजार रुपयांवर आले आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने शेतकर्यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे दिवाळी तोंडावर आली असताना अचानक दर कोसळल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे.