Dhule Case Scam : गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणाला एक महिना उलटला, पोलिसांकडून फक्त अदखलपात्र गुन्हा; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, म्हणाले...
Dhule Case Scam : धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 102 मध्ये 22 मे 2025 रोजी माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसह धाड टाकून तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती.

Dhule Case Scam : धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 102 मध्ये 22 मे 2025 रोजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसह धाड टाकून तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. या रोख रकमेचा संबंध धुळे जिल्ह्यातील अंदाज समितीच्या भेटीशी असल्याचा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला होता. मात्र, या प्रकरणाला आता एक महिना उलटून गेला असतानाही कोणत्याही व्यक्तीवर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिवसेनेने राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे धुळे शहरातील जुनी महानगरपालिका समोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
एसआयटी प्रमुखाचे नाव अद्याप जाहीर का झाले नाही?
गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणातील कोणतीही ठोस कारवाई अद्याप झाली नाही, याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एसआयटी चौकशी नेमण्याचे आदेश देण्यात आले असले तरी एसआयटी प्रमुखाचे नाव अद्याप जाहीर का झाले नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच, आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली आहे.
किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नार्को टेस्ट करावी
याबाबत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी म्हणाले की, गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये एक कोटी 84 लाख रुपयांची रक्कम सापडली होती. ती सापडून आज एक महिना उलटत आहे. या प्रकरणाची चौकशी ज्याप्रमाणे सुरू आहे, ती अत्यंत संथ गतीने सुरु आहे. केवळ टाईमपास सुरू आहे. हे प्रकरण शासनाला दडपायचे आहे, असा आमचा आरोप आहे. एक कोटी 84 लाख रुपये सापडून देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग अँटी करप्शन ॲक्ट, मकोका अशा कायद्यांच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले पाहिजे होते. तसेच किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आणखी वाचा
























