Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्यापासून धाराशिव दौऱ्यावर, जनसंवाद मेळाव्यातून तोफ धडाडणार
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या दि.16 व दि. 17 धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध ठिकाणी जनसंवाद मेळावे घेणार आहेत.
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या दि. 16 व दि. 17 धाराशिव (Dharashiv) दौऱ्यावर येणार आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे यांचे कल्याण, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर, शिर्डी लोकसभा दौरे पार पडले आहेत. त्यानंतर आता ते धाराशिव येथे दौरा करणार आहेत.
उद्धव ठाकरे हे धाराशिव लोकसभेत विविध ठिकाणी जनसंवाद मेळावे घेत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे धाराशिव जिल्ह्यात आले होते. त्यांनी येथे शिवसंकल्प सभा घेतली होती. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे याच्यावर सडकून टीका केली होती. आता उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उद्धव ठाकरे दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
औसा, लामजना चौक, उमरगा आणि तुळजापूर येथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.तसेच उद्धव ठाकरे दौऱ्यादरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनालादेखील जाणार आहेत. शुक्रवारी (दि.16) उद्धव ठाकरे हे औसा, उमरगा, तुळजापूर येथे सभा घेतील. त्यानंतर धाराशिव येथे उद्धव ठाकरे मुक्कामी असतील. शनिवारी (दि. 17) उद्धव ठाकरे वाशी, भूम, परांडा, बार्शी येथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या सभांची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) हा पहिलाच धाराशिव दौरा असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजितसिंह पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. शिवसेना फुटल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धाराशिव- कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. तर परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत व उमरगा-लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात सहभागी झाले. या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे धाराशिव लोकसभेचा गड राखण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा