Dharashiv : मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत; आणखी एक नेता ठाकरे बंधूंच्या पाठीशी
Raju Shetti On BMC Election : महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती घ्या, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवर किती प्रेम आहे हे समजेल असं माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणूस वि. हिंदी भाषिक या लाईनवर येत असताना आता आणखी एका नेत्याने ठाकरे बंधूंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती आहे असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती घ्यावी, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवरील प्रेम दिसून येईल असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये झालेल्या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी मुंबईत मात्र ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असं राजू शेट्टी म्हणाले.
Raju Shetti On Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबईवर, मराठी माणसावर प्रेम आहे, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतोय असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल असं राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचं अधिवेशन घेतलं. त्यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
Shaktipeeth Mahamarg Hingoli Protest : हिंगोलीत शक्तिपीठाविरोधात मोर्चा
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शक्तिपीठ महामार्ग हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातून जात असल्याने या महामार्गासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. परिणामी बाधीत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असा दावा करत शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजी भिडे यांनी सांगलीत भेट घेतली. यावेळी शक्तिपीठ महामार्ग जुन्याच पद्धतीने करण्याची मागणी भिडे यांनी केली. त्यासाठी निवेदनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठाचा मार्ग बदलू नये अशी ठाम मागणी त्यांनी केली. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठचा मार्ग बदलण्याची घोषणा केली होती.
ही बातमी वाचा:























