Tanaji Sawant : विधानसभेत गुलाल उधळला, मात्र निकाल लागल्यापासून गायब, मतदारसंघात न फिरकलेले तानाजी सावंत राज्यातील हे एकमेव आमदार
Tanaji Sawant Shiv Sena MLA : पक्ष, मेळावे, पावसाळी अधिवेशन अशा सर्वच कार्यक्रमांकडे तानाजी सावंत यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

धाराशिव : माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे (Bhum Paranda Assembly Constituency) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तानाजी सावंत अद्याप एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामुळे निकालानंतर मतदारसंघाला एकदाही भेट न दिलेले तानाजी सावंत हे राज्यातील एकमेव आमदार असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.
एवढंच नाही तर आमदार तानाजी सावंत यांनी मतदारांचा संपर्क देखील तोडून टाकल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हा सध्या भूमपरंडा विधानसभा मतदारसंघाचा कारभार पाहत असल्याचे दिसत आहे.
Tanaji Sawant News : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज
भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत अवघ्या 1500 मताने निवडून आले. त्यातूनच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सावंत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सावंत यांनी पावसाळी अधिवेशनाकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे तानाजी सावंतांचं नेमकं चाललंय काय याची मतदारसंघासह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर राजीनामा देऊन पुण्यात राहावं अशी टीका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली.
तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, राहुल मोटेंची मागणी
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसेल तर तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी केली. ते म्हणाले की, निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी देखील तानाजी सावंत मतदारसंघात आले नाहीत. तानाजी सावंत यांना त्यांच्या उद्योगधंद्यासाठी संरक्षण हवं म्हणून आमदारकी हवी होती. पुण्यात बसून ते त्यांचे उद्योग सांभाळत आहेत. त्यामुळे मतदारसंघात ते फिरकले नाहीत. तानाजी सावंत यांना जनतेने जनादेश दिलेला असताना जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तानाजी सावंत यांना राज्यात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. या आधीच्या सरकारमध्ये त्यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा आहे.
तानाजी सावंत हे आमदार झाल्यापासून पक्षाच्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
























