Congress : ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार? राज ठाकरेंची भूमिका अमान्य, दिल्लीमध्ये नेत्यांची खलबतं
Maharashtra Congress Meeting : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वाढणाऱ्या जवळीकतेमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात जोरदार चर्चा असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस स्वबळावर लढणार असे संकेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात 7 जुलै रोजी मुंबईतील बैठकीत निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात दिल्लीमध्ये काँग्रेसची एक बैठक पार पडली. त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या निर्णयावरही चर्चा झाली. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये राहून एकत्र निवडणूक लढवायची की स्वबळावर लढायचं यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला अमान्य
राज ठाकरेंची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नसून भारत एक असल्याचं रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं. सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. पण पक्षाला निर्णय घ्यायचा आहे असं रमेश चेन्नीथला म्हणाले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस स्वबळाचा नारा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ठाकरे बंधूंची जवळीकता, काँग्रेसमध्ये अस्वस्थता
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामधली जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याविषयीचा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे.
7 जुलैच्या बैठकीत निर्णय होणार
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची एक बैठक सोमवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पार पडली. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची की एकत्र या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. त्याविषयी प्रश्न विचारलं असता, मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार का याचा निर्णय 7 जुलैला होईल असं चेन्निथला यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशीही चर्चा करू, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या राजकीय घडामोडींविषयी समितीची मुंबईत बैठक होणार असून, त्या बैठकीसाठी चेन्निथला पुन्हा मुंबईत येणार आहेत.
काँग्रेसला राज ठाकरे का नकोत?
राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षात हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली आहे. माहीमची समुद्रातील अनधिकृत मजार हटवणे, मशिदीवरील भोंगे उतरवणे असे विषय अजेंड्यावर घेतले. तर उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतं मिळाली होती. मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, कुर्ला, चांदिवली आणि मालाड मालवणी या भागातील मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेकडं वळली होती. राज ठाकरेंमुळं ही मतं दूर जाण्याची काँग्रेसला भीती वाटत असल्याची चर्चा आहे.























