Maratha Reservation : संभाजीनगरच्या आठही आगारात बस जागेवरच उभ्या; महामंडळाला दिड कोटीचा तोटा
Maratha Reservation : मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला एकूण दिड कोटीचा तोटा झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक वळण लागले आहे. ज्यात एसटी परिवहन मंडळाच्या बसेसवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिवहन मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी बसेस (ST Bus) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला दिड कोटीचा तोटा झाला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी बीडमध्ये 50 पेक्षा अधिक बस गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत छत्रपती संभाजीनगरच्या दहा बसेसचा समावेश आहे. या सर्व बसेसचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले. तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पाहता छत्रपती संभाजीनगरच्या परिवहन विभागाने बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी दुपारपासून जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे महामंडळाला दिड कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. संभाजीनगर आगाराच्या रोजच्या 222 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस पाहता एकूण 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तोडफोड आणि बस बंद ठेवण्याचा निर्णय पाहता आतापर्यंत संभाजीनगर परिवहन विभागाचे दिड कोटीचे नुकसान झाले आहे.
प्रवाशांचे हाल..
मराठा आरक्षणावरून होत असलेल्या हिंसक आंदोलानानंतर आता एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान याचा फटका प्रवाशांना बसतांना दिसत आहे. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण जण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावं असा प्रश्न प्रवाशांना बसत आहे. तर खाजगी वाहनांधारकांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांना याच आर्थिक फटका बसत आहे.
ग्रामीण भागातील इंटरनेट बंद...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटताना पाहायला मिळतायत. तसेच, काही लोकं सोशल मीडियावर अफवा देखील पसरवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून इंटरनेट बंद करण्यात आला आहे. बुधवारपासून छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. तर, 3 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ST Bus: मराठा आंदोलनाचा गीअर, एसटीला ब्रेक; जाणून घ्या कुठल्या मार्गावर लालपरीच्या फेऱ्या रद्द