आधी तुमचे पाया पडायचो, आता तुमच्याबद्दल घृणा निर्माण झाली; शिरसाटांची ठाकरेंवर घणाघात
Sanjay Shirsat : संस्कारी माणसाने पडलेले पाया जर तुम्हाला लाचारी वाटत असेल, तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या महापत्रकार परिषदेवर (Maha Patrakar Parishad) आता विरोधकांकडून टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील महापत्रकार परिषदेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आधी तुमचे पाया पडायचो, आता तुमच्याबद्दल घृणा निर्माण झाली असल्याचा' खोचक टोला शिरसाट यांनी ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "या पत्रकार परिषदेत दुर्दैवाने त्यांनी एक गोष्ट दाखवली, ज्यात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे पाया पडत आहे. हो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे पाया पडले, आम्ही देखील 2018 मध्ये पाया पडत होतो. मात्र, 2019 नंतर बदललेली परिस्थितीमुळेच हा उठाव झाला. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत ज्यावेळी गेला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला. त्यामुळे बाळासाहेब यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली, परंतु तुमच्याबद्दल घृणा लोकांच्या मनात निर्माण झाली. यातून तुमचे कमीपणाचे संस्कार दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. एकनाथ शिंदे माझे कसे पाया पडत होते हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. संस्कारी माणसाने पडलेले पाया जर तुम्हाला लाचारी वाटत असेल, तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
महापत्रकार परिषद नव्हे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले की, "मुंबईत ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेच्या नावाखाली कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. विविध क्षेत्रातील नामवंत, वकील, पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करावे आणि यांनी उत्तर द्यावं असे अपेक्षित होतं. मात्र, या पत्रकार परिषदेची सुरुवात पाहिल्यास तो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असल्याचं वाटत होतं. वर्ल्ड रेकॉर्ड अशी पत्रकार परिषद घेत असल्याचं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. या पत्रकार परिषदेत वकिलांनी कायदेशीर बाजू मांडणं इथपर्यंत ठीक होतं. मात्र, ज्यांची वकिली चालत नाही, ते वकील नेत्यांची भाषा करत होते. एकीकडे सुसंस्कृत भाषेत बोलण्याचं सांगत होते आणि दुसरीकडे राज्यपालांना नालायक म्हणत होते. मला वाटतं त्या वकिलाने देखील संजय राऊत यांची स्क्रिप वाचली असावी. त्यामुळे या वकिलांचा देखील काही दिवसात ठाकरे गटात प्रवेश होतो की काय असं मला वाटत आहे,असं शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते...
त्यांना आणखी माहीत नाही, आमचा मेळावा झाला आहे. आम्ही घटना दुरुस्तीसाठी कागदपत्रे दाखल केले आहे. पक्षाचे मुख्य नेता हे पद एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आले आहे. विधीमंडळात आतमध्ये आणि बाहेर पण तेच पक्षाचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असेही शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: