Sanjay Raut : ...तर भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाहीत; संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut : बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तुम्हाला तर भाजप ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकादेखील जिंकू शकणार नाही. या देशात मोदींचे राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकूमशाहीचे राज्य आहे.
Sanjay Raut छत्रपती संभाजीनगर : जगात कुठेही ईव्हीएम (EVM) नाही. ज्या मतदानप्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही ती चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही लादू आहात. भाजपचे (BJP) प्रमुख लोकं मोदीजींना विष्णूचा 13 वा अवतार मानतात. प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यात आहे, असे ते सांगतात तर तुम्ही बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका का घेत नाहीत. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत, तुम्हाला प्रभू श्रीरामदेखील वाचवणार नाही, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले की, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तुम्हाला तर भाजप ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकादेखील जिंकू शकणार नाही. या देशात मोदींचे राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकूमशाहीचे राज्य असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. भाजप बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास का घाबरत आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला आढावा
23 तारखेला नाशिकला (Nashik) ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होईल. या सभेची जय्यत तयारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने आज आढावा घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपला कोणीही मागच्या दाराने मदत करणार नाही
जागावाटपाबाबत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील जागावाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. यावेळी भाजपला कोणीही मागच्या दाराने मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. ओठात एक आणि पोटात एक असं कोणीही करणार नाही.
2024 ला देशात अन् राज्यात होणार परिवर्तन
पुढील 2-4 दिवसांत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आम्ही अंतिम चर्चा करून अंतिम मसुदा ठरवणार आहोत. देशात 300 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. 150 ते 175 जागांवर प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत आहे. 543 जागांचे गणित आमच्यासमोर स्पष्ट असून 2024 ला या देशात आणि राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या