Samruddhi Highway Accident : 'समृद्धी'चा नव्हे मृत्यूचा महामार्ग; दहा महिन्यांत 123 बळी, दरमहा 128 अपघात
Samruddhi Highway Accident : मागील 10 महिन्यांत या महामार्गावर सर्व मिळून 1281 अपघात झाले असून, त्यात 123 जणांचा बळी गेला आहे.
Samruddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिकांची चर्चा होऊ लागला. तर, हा 'समृद्धी'चा नव्हे मृत्यूचा महामार्ग बनला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण मागील 10 महिन्यांत या महामार्गावर सर्व मिळून 1281 अपघात झाले असून, त्यात 123 जणांचा बळी गेला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धीचे मोठ्या गाजावाजा करत लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील मोठे योगदान आहे. तर, 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या आणि 26 मे 2023 दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण करण्यात आले. मात्र, समृद्धी सर्वसामन्यांसाठी सुरु करताच एकमागून एक अपघातांची मालिका पाहायला मिळाली. अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची 150 ही मर्यादा 120 वर आणली गेली. मात्र, समृद्धीच्या दृष्टीने उभारण्यात आलेली यंत्रणा अजूनही अपघात रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली नसल्याचे चित्र आहे. समृद्धी महामार्गावर मदतीसाठी पूर्ण टोलनिहाय यंत्रणा उभारल्याचा दावा करण्यात येत असला तरीही अपघातांच्या मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर कोणतेही तपासणी होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर, ज्यांच्यावर तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे, ते वसुलीत व्यस्थ असल्याचा आरोप होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघात...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर देखील सतत छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडतच असल्याचे समोर आले आहे. आजवर जिल्ह्यात 14 लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली असून, त्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथिमक माहिती आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर 120 कि.मी. पर्यंत आहे.
दहा महिन्यांत महामार्गावर झालेले अपघात
- नागपूर ते मुंबईपर्यंत एकूण 1281 अपघात झाले आहेत.
- यात एकूण 932 किरकोळ अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
- यात एकूण 417 मोठे अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
- मागील दहा महिन्यात 123 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई...
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाहून नाशिकला परत जात असताना या भाविकांवर काळानं घाला घातला. धक्कादायक म्हणजे अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने थांबवल्यानेच मागून आलेली टेम्पो बस येऊन धडकल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे आरटीओने ट्रकला थांबवल्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणी हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: